महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या नाशिक जिल्हा उच्च माध्यमिक विभागाच्या अध्यक्षपदी सोपान कांगने यांची अविरोध निवड,
शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते सोपान कांगणे यांना नियुक्तीपत्र प्रदान
प्रतिनिधी l देवळाली कॅम्प
डॉ. गुजर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, देवळाली कॅम्प येथील शिक्षक श्री. सोपान आनंदा कांगणे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या नाशिक जिल्हा उच्च माध्यमिक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सोपान कांगणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "शिवसेनेचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे."
संघटनेच्या अध्यक्षांना प्राप्त अधिकारानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक मजबूत करण्याबरोबरच संघटनेचा विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सोपान कांगणे हे देवळाली कॅम्प येथील डॉ. गुजर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असून, शिक्षक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे देवळाली कॅम्पसह नाशिक जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सोपान कांगणे यांचे अभिनंदन करून संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडावेत आणि संघटनात्मक कार्याला गती द्यावी, असे आवाहन केले.
या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष (माध्यमिक) एम. के. वाघ, व्ही. नाईक संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक मधुकर सांगळे, हर्षल दराडे, सुभाष आव्हाड, राकेश राणे, पोपटराव फोकणे, माधव आव्हाड, अंकुश कराड, संतोष उगलमुगले, स्वप्नील कोरडे, सरस्वती काकड, भाग्यशाली गीते यांच्यासह असंख्य शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
सोपान कांगणे यांच्या नियुक्तीमुळे शिक्षक संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यक्त केला.