नांदेड : प्राचीन हिंदू संस्कृती, धार्मिक परंपरा आणि नदीपूजनाचे महत्त्व जपण्यासाठी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि योगेश जायसवाल हे गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने गोदावरी गंगा पूजनाचा भव्य सोहळा आयोजित करीत आहेत. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, धार्मिक परंपरेचे संवर्धन करण्याबरोबरच सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे आहे, असे गौरवोद्गार लायन्स प्रांतपाल राहुल औसेकर यांनी काढले. यावेळी त्यांनी दिलीप ठाकूर व योगेश जायसवाल यांना लायन्स इंटरनॅशनलचे मेडल प्रदान करून त्यांचा विशेष गौरव केला.त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित २६ व्या गोदावरी गंगा पूजन सोहळ्यात हजारो महिलांनी एकाच वेळी गोदावरी मातेची आरती केल्याने नगीना घाटाचा संपूर्ण परिसर दीपप्रकाशाने उजळून निघाला. मोरपंखी साड्या परिधान केलेल्या हजारो महिलांच्या सामूहिक आरतीचे विहंगम दृश्य उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. भव्य आतषबाजी, सांगीतिक आरती आणि धार्मिक वातावरणाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती.*
कार्यक्रमाच्या प्रारंभी लंगर साहेब गुरुद्वाराचे प्रतिनिधी बाबा सुबेक सिंग यांच्या हस्ते गोदावरी माता, गोदावरी नदी आणि गुरु नानकजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, प्रदेश युवती प्रमुख सांभवी साले, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, आशा शिंदे, नगरसेविका रुची भारतीया व अमृता ठाकूर, प्रवीण साले, विजय येवणकर, शीतल खांडील, विजय गंभीरे, व्यंकटेश जिंदम, बागड्या यादव, अनिल हजारी आणि कामाजी सरोदे,अनिल चिद्रावार हे उपस्थित होते.
लायन्सचे पूर्वप्रांतपाल जयेश ठक्कर, ॲड. प्रवीण अग्रवाल, रवि कडगे, धनंजय डोईफोडे तसेच अन्य लायन्स पदाधिकाऱ्यांचा अमृता व योगेश जायसवाल यांच्या हस्ते शिरोपाव व मोत्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला. संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविकातून गेल्या २६ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. हरिद्वार आणि वाराणसीनंतर भव्यतेच्या बाबतीत जगातील तृतीय क्रमांकाची गंगा आरती म्हणून नांदेडच्या या सोहळ्याची ओळख निर्माण झाली असून, गेल्या वर्षी या उपक्रमाची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
संतोषगुरू परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने गोदावरी मातेचे पूजन करण्यात आले. लायन्स उपप्रांतपाल योगेश जायसवाल यांच्या वतीने पूजनासाठी आलेल्या हजारो महिलांना द्रोण, दिवे आणि फुले मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. मोरपंखी साडी परिधान करून आलेल्या महिलांनी एकाच वेळी गोदावरी मातेची आरती केली. या वेळी सालासार भजन मंडळाच्या वतीने सांगीतिक आरती सादर करण्यात आली. कुबेरनगरी, लोंढेसांगवी यांच्या वतीने करण्यात आलेल्या भव्य आतषबाजीने संपूर्ण घाट परिसर प्रकाशमय झाला.
आकर्षक पूजेची थाळी सजविण्याच्या स्पर्धेत शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुषमा ठाकूर, भारती शामराज, मानिनी नांदेडकर आणि मृदुला पत्की यांनी परीक्षण करून निवडलेल्या नंदिनी नगारे यांच्यासह २१ महिलांना राहुल औसेकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. संस्कार भारतीच्या वतीने साकारण्यात आलेल्या भव्य रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या रांगोळीसोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वेळेवर उपस्थित राहिलेल्या पहिल्या पाच हजार महिलांना मोत्याच्या माळांची विशेष भेट देण्यात आल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी गंगा पूजनाची महती देशभर पोहोचविण्यासाठी योगदान देणारे श्रीपाद देव यांच्यासह सर्व माध्यम प्रतिनिधींचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अंदमान, गुजरात, गोवा, काश्मीर, गंगासागर, उत्तर प्रदेश, केरळ आणि नेपाळ यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्या नांदेडकरांचाही सन्मान करण्यात आला.समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा आणि मायची ऊब या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचाही यावेळी गौरव करण्यात आला. धार्मिक सोहळ्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवा लोट, अरुण काबरा आणि गणेशसिंह परमार यांनी केले, तर सुरेश लोट यांनी आभार मानले. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी जगतसिंह ठाकूर, प्रभुदास वाडेकर, प्रकाश उंटवाले, बलभीम पत्की, संतोष बच्चेवार, जयश्री ठाकूर, सविता काबरा, राहुल ठाकूर आणि रुद्र जोड यांनी परिश्रम घेतले.
महानगरपालिकेच्या वतीने जीवरक्षक आणि प्रकाशव्यवस्थेची सोय करण्यात आली होती. वजीराबाद पोलीस स्टेशनतर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, तर लंगर साहेब गुरुद्वाराच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.गेल्या २६ वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेला गोदावरी गंगा पूजनाचा हा उपक्रम आता केवळ धार्मिक सोहळा राहिलेला नसून, गोदावरी नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणारी आणि सर्वधर्मीय सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी एक व्यापक चळवळ बनला आहे.