नांदेडमध्ये 28 नोव्हेंबरपासून जिल्हास्तरीय युवा महोत्सव;युवकांना कलागुण सादरीकरणाची संधी;लोकनृत्य, लोकगीत, पथनाट्य, चित्रकला व कविता लेखन स्पर्धा; 27 नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/11/2026 6:59 AM

नांदेड : युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देतानाच व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी ‘नशामुक्त युवा–विकसित भारतासाठी’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2026-27 चे आयोजन दि. 28 व 29 नोव्हेंबर 2026 रोजी अंबिका मंगल कार्यालय, छत्रपती चौक, नांदेड येथे करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत नेतृत्व संवाद (VBYLD) 2027 अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी केले आहे.

*पाच सांस्कृतिक स्पर्धांतून व्यसनमुक्तीचा जागर*

महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा पाच स्पर्धा घेण्यात येणार आहेत. लोकनृत्य व लोकगीतांतून लोकसंस्कृतीचे दर्शन, पथनाट्यातून सामाजिक प्रबोधन, तर चित्रकला व कविता लेखनातून युवकांच्या सर्जनशील विचारांना व्यासपीठ मिळणार आहे. व्यसनमुक्ती, सामाजिक जागृती आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचे योगदान हे स्पर्धांचे प्रमुख विषय असतील.

*15 ते 29 वर्षे वयोगटातील युवकांना सहभागाची संधी*

दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी युवकांचे वय 15 ते 29 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सहभागी युवक संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावा किंवा त्या जिल्ह्यात शिक्षण घेत असावा. एका युवकाला केवळ एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. विकसित भारत नेतृत्व संवाद 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले युवक या स्पर्धांसाठी पात्र नसतील. सर्व सहभागी युवक-युवतींनी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. चित्रकला व कविता लेखनातील कलाकृती मौलिक असाव्यात. कोणत्याही जाती किंवा धर्माच्या भावना दुखावणारा मजकूर अथवा वेशभूषा मान्य केली जाणार नाही.

*विजेत्यांसाठी रोख पारितोषिके*

समूह लोकनृत्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 7 हजार, 5 हजार आणि 3 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. समूह लोकगीत व पथनाट्य स्पर्धेत प्रत्येकी 5 हजार, 3 हजार आणि 2 हजार 500 रुपये, तर चित्रकला व कविता लेखन स्पर्धेत प्रत्येकी 3 हजार, 2 हजार आणि 1 हजार 500 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणारे संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील. राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सव दि. 10 ते 12 जानेवारी 2027 या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार आहे.

*ऑनलाइन व प्रत्यक्ष नोंदणीचे आवाहन*

इच्छुक स्पर्धकांनी गुगल फॉर्म आणि माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी. स्पर्धानिहाय विहित नमुन्यातील अर्जासह नावनोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडियम परिसर, गोकूळनगर, नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावी किंवा गुगल फॉर्म : https://forms.gle/IdEVMwRqZDPhDe4GS
माय भारत पोर्टल : https://mybharat.gov.in/vo/orgeventmanagement/event_detail_nyf/MjM0MDg3
वर नोंदणी करावी किंवा dsonanded@rediffmail.com या ई-मेलवर दि. 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत पाठवावीत. 
स्पर्धेच्या अटी, नोंदणी प्रक्रिया व अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर (मो. 7517536227) यांच्याशी संपर्क साधावा. युवकांनी कला, साहित्य आणि सर्जनशील विचारांच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा आणि जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवक-युवतींनी महोत्सवात सहभागी होऊन विभागीय व राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या