नांदेड : शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या; परंतु जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया अद्याप सुरू असलेल्या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटींची तातडीने ऑनलाइन पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांनी केले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय व आयुष शिक्षण तसेच कला शिक्षण विभागांतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अद्याप निर्णय प्रक्रियेत आहे. अशा पात्र विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत संबंधित समित्यांकडून एसएमएस, ई-मेल व पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, सूचना देऊनही अनेक विद्यार्थी व अर्जदारांनी अद्याप संबंधित समित्यांशी संपर्क साधलेला नाही.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जदार लॉगिनवरून तातडीने ऑनलाइन त्रुटी पूर्तता करावी. यासाठी www.cvc.barti.in या नवीन संकेतस्थळावर बार्टी हेल्पडेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अर्जदारांच्या शंका निरसन व मदतीसाठी दूरध्वनी : 020-26333339, व्हॉट्सअॅप : 9404999452 (फक्त संदेशासाठी), ई-मेल : helpdesk@barti.in वर संपर्क सुविधा उपलब्ध आहेत.
अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित अर्जदारांची राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी व पालकांनी नवीन संकेतस्थळ आणि सुधारित नागरिक-केंद्रित सेवांचा लाभ घेऊन अर्जातील त्रुटींची वेळेत पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेडचे अध्यक्ष डॉ. किरण महाजन, उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव रामचंद्र वंगाटे यांनी केले आहे.