नांदेड :- गाव स्वच्छ, शाश्वत व विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन भोकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर देशमुख यांनी केले.
भोकर तालुक्यातील खरबी येथे स्वच्छ शौचालय- गरिमामय भविष्य तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत त्यांनी आज गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील गुणांकन व निकषांनुसार गावात राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सार्वजनिक शौचालय तसेच शाळेतील स्वच्छता संकुलाचीही पाहणी करून स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक सूचना केल्या.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गावातील वैयक्तिक, सार्वजनिक व संस्थात्मक शौचालये स्वच्छ व सुस्थितीत कार्यान्वित असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ शौचालय- गरिमामय भविष्य हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. विशेषतः महिला, मुली आणि दिव्यांग व्यक्तींचा सन्मान जपत त्यांना सुरक्षित व स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
खरबी ग्रामपंचायतीने यापूर्वी स्मार्ट ग्राम तसेच धरती आबा अभियानांतर्गत तालुका स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातही ग्रामपंचायतीने तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला असून आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.
यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ मिलिंद व्यवहारे, भगवानराव कल्याणकर, गट समन्वयक प्रदीप वाठोरे, ग्रामपंचायत अधिकारी जी. पी. वानखेडे, प्रतापराव कल्याणकर, राजू चेनेवाड, राजू मोरे, मुख्याध्यापक बाबुराव माडगे, संतोष सूर्यवंशी, बचत गटाच्या सीआरपी ज्योती भगत, विजय कल्याणकर, रतनबाई कल्याणकर, वर्षा बडबडकर आदी उपस्थित होते.