ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक - युवतींसाठी स्वयंरोजगाराची संधी;परशुराम महामंडळाची राज्यभर अर्ज स्वीकृती शिबिरे आयोजित - प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/11/2026 10:13 PM

नांदेड :- ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. महामंडळाच्या विविध कर्ज व्याज परतावा योजनांची माहिती देण्यासाठी तसेच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी एक दिवसीय अर्ज स्वीकृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबरपासून या शिबिरांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी दिली आहे.
या शिबिरांचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी नागपूर, २६ नोव्हेंबर रोजी अमरावती, २८ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, ३० नोव्हेंबर रोजी नाशिक, २ डिसेंबर रोजी पुणे आणि ४ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही शिबिरे होणार आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील शिबिराला समाज बांधवांनी व इच्छुक तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निखिल लातूरकर यांनी केले आहे.

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा अशा दोन प्रमुख योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक कर्ज योजनेअंतर्गत बँकेकडून घेतलेल्या पाच, दहा आणि पंधरा लाख

रुपयांच्या कर्जावर अनुक्रमे दीड लाख, तीन लाख आणि साडेचार लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा मिळू शकतो. नियमित हप्ते भरल्यास कमाल सात वर्षांपर्यंत १२ टक्के किंवा बँकेने आकारलेला व्याजदर यापैकी कमी दराने व्याज परतावा दिला जातो.

गट कर्ज व्याज परतावा योजनेत दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रितपणे ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची सुविधा आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांच्या गटासाठी १५ लाख रुपयांपर्यंत व्याज परताव्याची तरतूद आहे. या योजनांसाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आणि ब्राह्मण समाजातील असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असून, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असावे. महिलांसाठी ३० टक्के, तर दिव्यांगांसाठी तीन टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या