संविधानाच्या जयघोषात नांदेडमध्ये भव्य संविधान रॅली;समाजकल्याण विभागाचा पुढाकार;संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन,विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/11/2026 4:51 AM

नांदेड :- भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रसार, नागरिकांमध्ये लोकशाहीविषयी जाणीव आणि संविधानाने दिलेल्या अधिकार व कर्तव्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने येथील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने संविधान दिनानिमित्त शहरात भव्य संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.
रॅलीच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास, तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी रेखा शेंडगे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवानंद मिनगीरे आणि रेखा शेंडगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. 
महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते शिवाजीनगर, कलामंदिर, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून सादर केली.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटनांपैकी एक असून, जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचा अभ्यास करावा. संविधानाने दिलेले अधिकार समजून घेतानाच त्यातील कर्तव्यांचेही प्रामाणिकपणे पालन करावे, असे आवाहन केले. त्यानंतर उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. रॅलीत पोलीस बँड पथकाने देशभक्तिपर गीतांच्या धून सादर करून उत्साह निर्माण केला. 
या रॅलीत मदर टेरेसा नर्सिंग स्कूल, सहयोग कॅम्पस, सिडको येथील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, नांदेड आदर्श विद्यालय, टिळकनगर येथील विद्यार्थी व शिक्षक, स्काऊट-गाईड, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत, विविध महामंडळांचे अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी सैनिक संघटना, पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी श्री हुजूर साहेब ब्लड सेंटर, नांदेड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास समाजकल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी गजानन नरवाडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी, अधिवक्ता इम्रान खान, विजय सुवर्णकार, एल. ए. हिरे, सुनील केंद्रे, ए. एस. पंडित, कैलास मोरे, लक्ष्मी गायके, पंडित खानसोळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Share

Other News

ताज्या बातम्या