*अकरा रथ, चाळीस घोडे, हत्ती आणि पाच वाद्यांच्या गजरात शोभायात्रा; आत्मशांतीचा मार्ग दाखवणारी ज्योत म्हणजे धर्मज्योत – आचार्य विद्यासागर महाराज*
कुपवाड : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल) येथे आयोजित श्री सिद्धोत्सव आराधना व विश्वशांती महायाग महोत्सवाची बुधवारी (दि. २५) नवव्या दिवशी भव्य रथोत्सव शोभायात्रेने सांगता झाली. अकरा रथ, एक हत्ती, चाळीस घोडे आणि पाच वाद्यांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेमुळे कुपवाड परिसर दुमदुमून गेला. भक्तिमय वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेत जैन समाजातील युवक श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी सात वाजता राजा श्रीपाल व मैना सुंदरी यांचे मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने मंडपात आगमन झाले. यावेळी जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. सकाळी आठ वाजता श्री सिद्धचक्र विधानाचे पूजन, १०८ कलशांनी अभिषेक, मंदिरावर बारा फुटी पंचधातूचे ध्वजपट लावण्यात आले. महाभिषेक आणि विश्वशांती महायागाचे धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर दुपारी तीन वाजता त्यागींचे मंगल प्रवचन, रत्नवृष्टी, आचार्यश्रींची संघपूजा आणि सत्कार समारंभ झाला.
सायंकाळी सहा वाजता धर्मध्वजा घेऊन शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर रात्री सात वाजता भव्य श्री विहार रथोत्सवाला प्रारंभ झाला. अकरा रथ, हत्ती, 40 घोडे आणि पाच वाद्यांच्या सहभागामुळे शोभायात्रेला विशेष भव्यता प्राप्त झाली. रथोत्सवाच्या मार्गावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगल वाद्यांचा निनाद, धार्मिक जयघोष आणि उत्साही वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
दरम्यान, आचार्य विद्यासागर महाराज यांनी प्रवचनातून धर्मावरील श्रद्धा डोळस असली पाहिजे, अंधश्रद्धा कोणत्याही कामाची नाही, ती दुर्गतीला कारण बनते, असे प्रतिपादन केले.
वर्तमान युग धक्काधक्कीचे, धावपळीचे, तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त बनले आहे. अशा परिस्थितीत आपल्याला शांतीचा महामंत्र आणि आत्मशांतीचा मार्ग दाखवणारी ज्योत म्हणजे धर्मज्योत आहे. धर्माच्या माध्यमातून आत्मशांतीचा मार्ग मिळतो, असेही त्यांनी सांगितले.
*नऊ दिवसांच्या धार्मिक आराधनेची सांगता*
कुपवाड येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल) येथे १७ ते २५ नोव्हेंबरदरम्यान नऊ दिवसांचा सिद्धचक्र महामंडळ विधान महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात विविध धार्मिक विधी, पूजन, अभिषेक, प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. नवव्या दिवशी भव्य रथोत्सवाने या धार्मिक महोत्सवाची सांगता झाली.
या महोत्सवाला आचार्य विद्यासागर महाराज यांच्यासह विविध मुनी महाराजांचे मार्गदर्शन लाभले. जैन समाजातील विविध संस्था, मंडळे आणि श्रावक-श्राविकांनी महोत्सवाच्या आयोजनात सहभाग घेतला. भक्तिभावाने आणि उत्साहाने पार पडलेल्या या महोत्सवामुळे कुपवाड परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.