नांदेड : जिल्ह्यातील प्राणी कल्याणासाठी कार्यरत प्राणीमित्र, समाजसेवक आणि प्राणी कल्याण संस्थांच्या प्रतिनिधींना जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्य म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या समितीवर नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 23 डिसेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नांदेड यांनी केले आहे.
अर्जदार हा नांदेड जिल्ह्याचा रहिवासी असावा. प्राणी कल्याण, प्राण्यांचे हक्क आणि प्राणी छळ प्रतिबंधक क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवाच्या पुष्ट्यर्थ छायाचित्रे, प्रसारमाध्यमांतील वृत्तांची कात्रणे आदी कागदपत्रे जोडावीत. नोंदणीकृत प्राणी कल्याण संस्थेचे प्रतिनिधी असल्यास संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आणि शिफारस पत्र सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी सविस्तर बायोडाटा, अनुभवाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, नांदेड येथे प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 23 डिसेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून, मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.