भगूर-विजयनगर उड्डाणपुलाजवळ कचऱ्याचा विळखा; दोन्ही प्रशासनांच्या दुर्लक्षाविरोधात संघर्ष समिती आक्रमक

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 23/11/2026 6:30 PM

भगूर-विजयनगर उड्डाणपुलाजवळ कचऱ्याचा विळखा; दोन्ही प्रशासनांच्या दुर्लक्षाविरोधात संघर्ष समिती आक्रमक
​देवळाली कॅम्प / भगूर (२३ नोव्हेंबर): भगूर नगरपरिषद आणि देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या हद्दीलगत असलेल्या भगूर-विजयनगर जवळील उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात साचत असलेल्या दुर्गंधीयुक्त आणि सडलेल्या कचऱ्याचे रूपांतर अनधिकृत कचरा डेपोमध्ये होत आहे. प्रसार माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतरही दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेत थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) प्रादेशिक संचालकांकडे धाव घेतली आहे.
​MPCB अधिकाऱ्यांकडे गांभीर्य स्पष्ट
​अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जनहितार्थ MPCB चे प्रादेशिक संचालक श्री. व्ही. किल्लेदार यांची भेट घेऊन या गंभीर समस्येची माहिती देण्यात आली. उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूला टाकण्यात येणारा कचरा दिवसेंदिवस वाढत असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे हा कचरा तात्काळ हटवण्याचे आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावेत, अशी आग्रही मागणी समितीने केली आहे.
​या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष दीपक मंडलिक, कार्याध्यक्ष अविनाश वाघ, कलाध्यक्ष संजय बलकवडे, तालुकाध्यक्ष राहुल मोरे, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, दिनेश साळवे, संजय वाघ, अजय काळे, रोहित शिंदे, रेखाताई निकुंभ आणि मनीषाताई सिरसाट आदी पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
​जबाबदारी ढकलण्याचा आरोप; स्वाक्षऱ्यांसह माहिती सादर
​या प्रकरणावर बोलताना कार्याध्यक्ष अविनाश वाघ यांनी भगूर नगरपरिषद आणि देवळाली छावणी परिषदेच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढले. दोन्ही प्रशासनांकडून या भीषण प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, एकमेकांवर जबाबदारी ढकलून प्रशासन आपले अंग काढून घेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत किंवा लगतचा परिसर स्वच्छ ठेवणे व कचरापट्टी हटवणे हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असताना प्रशासनाची ही उदासीनता जनतेच्या जीवाशी खेळणारी असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
​दोन्ही प्रशासनांनी 'आम्ही आमच्याच हद्दीतील कचरा साफ करू' अशी भूमिका घेतल्यास, त्यासाठी दोन्ही प्रशासनांच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरातील कचऱ्याची सविस्तर माहिती तसेच स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
​प्रसार माध्यमांच्या वृत्तानंतरही उदासीनता कायम
​ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवकांनी मांडलेल्या समस्येची दखल घेत ज्येष्ठ पत्रकारांनी उड्डाणपुलाजवळील अनधिकृत कचरा डेपो आणि अस्वच्छतेचे फोटो व व्हिडिओ वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमार्फत प्रसिद्ध केले होते. या भागातील कचरा तातडीने साफ करून पुन्हा कचरा टाकला जाऊ नये यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिकांकडून वारंवार होत होती.
​मात्र, आज २३ नोव्हेंबरपर्यंत भगूर नगरपरिषद आणि देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड या दोन्ही प्रशासनांनी घटनास्थळी भेट देणे तर दूरच, पण नागरिकांच्या गैरसोयीची दखलही घेतलेली नाही. ही बाब अत्यंत खेदजनक व चिंताजनक असल्याचे समितीने नमूद केले आहे. जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना MPCB प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही प्रशासनांना कचरा हटवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करण्यात आली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या