नांदेडः देशभरात जे जे उत्तम काम होते त्याचा उहापोह पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून घेत असतात. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी जमलेल्यांपैकी उद्योजक नवल गुप्ता यांना पंतप्रधानांची ‘मन की बात’ भावली व त्यातूनच त्यांनी आपल्या नातीच्या नामकरण सोहळ्यानिमित्त भेट मिळालेली रोख रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केली.
दर महिन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांनी पाहिला पाहिजे, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण प्रत्येक महिन्यास वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून ‘मन की बात’ कार्यक्रमानंतर त्यांच्य़ाशी संवाद साधतात.
अशाच एका कार्यक्रमात खा. अशोकराव चव्हाण यांनी शहरातील निवडक उद्योजकांना निमंत्रित केले होते. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर व त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाचा खर्च टाळून त्यातून संपूर्ण गावाचा विमा उतरविल्याचे कौतुकास्पद काम केले असल्याचे सांगितले होते. कार्यक्रमानंतर अनौपचारिक गप्पा मारताना खा. अशोकराव चव्हाण यांनी, असे उपक्रम आपणही राबवले पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या होत्या.
उद्योजक नवल गुप्ता व त्यांच्या पत्नी सौ. सुनिता यांनी त्यांची नात कनक हिच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात शहरातील अनेक नामवंतांची उपस्थिती होती. यावेळी कनक हिला उपहार म्हणून एक लाख 71 हजार रुपये मिळाले. या भेटस्वरुपात मिळालेल्या पैशाचा दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना उपयोग व्हावा, असा विचार या दाम्पत्यासह त्यांच्या परिवारातील अमन गुप्ता, अक्षत गुप्ता, डॉ. नयन गुप्ता व नुपूर गुप्ता यांनी केला. ज्यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना पुढे आली ते राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ही रक्कम शासनास देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळेच आज दि. २५ नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे ही रक्कम धनादेशाव्दारे सुपूर्द करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उद्योजक नवल गुप्ता, वरिष्ठ पत्रकार चारुदत्त चौधरी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती.