नांदेड :- सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला- पुरुष बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या जय उचाडे या विद्यार्थ्याने कांस्यपदक पटकावले. वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचा खेळाडू जय उचाडे याचा एका कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. सांगली जिल्ह्यातल्या सर्जेराव यादव प्रतिष्ठान ईश्वरपूर आणि एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल रेठरे धरण येथे १ली युथ (यू- १९) महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धा २०२६ घेण्यात आली. या स्पर्धेत ६०-६५ किलो वजन गटात महाविद्यालयाचा जय उचाडे याने उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेत कांस्यपदकासह तृतीय क्रमांक पटकावला. जय उचाडे याचा महाविद्यालयातर्फे सत्कार करताना प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी त्याचे कौतुक केले. भविष्यात राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचा नाव लौकिक वाढवण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाची विद्यार्थी जय उचाडे यशामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे, असे सांगून महाविद्यालयातील इतर विद्यार्थी खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम, शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्द जोपासत क्रीडा क्षेत्रात आपापले भरीव योगदान देण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव तसेच संस्थेचे सचिव एडवोकेट श्रीनिवास जाधव यांनी या यशाबद्दल शुभेच्छा पाठवल्या. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. डॉ.बाळासाहेब मोरे, प्रा. डॉ. राहुल सरोदे, प्रा. डॉ. महेश जाधव आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील प्राध्यापकांचेही यावेळी प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी अभिनंदन केले.