किसान ड्रोनच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी ; महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/11/2026 8:44 AM

नांदेड :- शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासह कृषी कामांमध्ये यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान ड्रोन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना कृषी फवारणी सेवा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली असून नांदेड जिल्ह्यातील तरुण शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी महाडीबीटी पोर्टलवर किसान ड्रोन घटकासाठी जास्तीत जास्त ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. 

किसान ड्रोन खरेदीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ड्रोनच्या किमतीच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक युवकांना कमी स्वभांडवलात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी सेवा व्यवसाय सुरू करता येणार आहे. ही कर्ज सुविधा बँकेच्या प्रचलित नियम व अटींनुसार मंजूर करण्यात येणार आहे.

*सात दिवसीय प्रशिक्षण व प्रमाणपत्राची सुविधा*
किसान ड्रोनचा सुरक्षित व प्रभावी वापर करता यावा, यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड यांच्या माध्यमातून सात दिवसीय प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, संचालन, फवारणी तंत्रज्ञान तसेच आवश्यक तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

*कमी वेळेत फवारणी आणि मनुष्यबळाची बचत*
किसान ड्रोनच्या साहाय्याने पिकांवर कीटकनाशके, बुरशीनाशके व इतर आवश्यक द्रवरूप कृषी निविष्ठांची फवारणी कमी वेळेत करता येते. ड्रोनद्वारे एका एकर क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी साधारणतः ६ ते ७ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे वेळ, श्रम आणि मनुष्यबळाची बचत होते. तसेच फवारणी करणाऱ्या व्यक्तींचा विषारी रसायनांशी थेट संपर्क टाळण्यास मदत होत असल्याने आरोग्यविषयक जोखीम कमी होते. शेतात प्रत्यक्ष प्रवेश न करता फवारणी करता येत असल्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासही मदत होते.

*ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगाराची संधी*
किसान ड्रोनच्या माध्यमातून युवकांना स्वतःचा कृषी फवारणी सेवा व्यवसाय सुरू करता येणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर फवारणी सेवा उपलब्ध करून देऊन नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण करता येऊ शकते. विशेषतः ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक आणि तरुण शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोजगाराची ही महत्त्वपूर्ण संधी आहे.

नांदेड जिल्ह्यातील इच्छुक तरुण शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक व कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी किसान ड्रोन घटकाचा लाभ घ्यावा. महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या