*विविध धार्मिक विधींसह पंचामृत अभिषेक व सिद्धचक्र विधान अर्घ्यपूजा संपन्न*
कुपवाड : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल) येथे आयोजित श्री सिद्धोत्सव आराधना व विश्वशांती महायाग महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यानिमित्त मंदिर परिसरात उत्साह आणि धार्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
पहिल्या दिवशी सकाळी नांदीमंगल, इंद्र यजमान प्रतिष्ठा, राजा श्रीपाल व मैना सुंदरी यांचे मंगल आगमन, आचार्यश्री व मुनीश्री निमंत्रण, कंकणबंधन, मंडपातील ध्वजारोहण, मंडप उद्घाटन, अखंड दीपस्थापना, कलश स्थापना, मंडपशुद्धी, सकलीकरण आदी धार्मिक विधी पार पडले. यानंतर जलकुंभ मिरवणूक व पंचामृत अभिषेक करण्यात आला.
सकाळी अकरा वाजता सिद्धचक्र विधान अर्घ्यपूजेला प्रारंभ झाला. यावेळी यंत्राभिषेक, चक्रवर्ती द्वारे विशेष पूजा, धनपती कुबेरद्वारे रत्नवृष्टी, होम-हवन विधी व अंकुरार्पण विधी असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारी त्यागींचे मंगल प्रवचन झाले. सायंकाळी मिरवणूक, ध्वजपट विहार, जप्य, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान काल सायंकाळी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे कुपवाड नगरीत आगमन झाले. यावेळी त्यांना सहवाद्य मिरवणुकीने आणण्यात आले. तसेच रात्री हळदी समारंभ पार पडला.
या महोत्सवात विविध भागांतील जैन बांधव सहभागी होत आहेत. सिद्धचक्र महामंडल विधानाच्या माध्यमातून धार्मिक साधना, भक्ती आणि विश्वशांतीचा संदेश दिला जात आहे.
या महोत्सवाचे आयोजन श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल), कुपवाड तसेच विविध जैन मंदिर संस्था, समित्या, मंडळे व समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.