कुपवाडमध्ये सिध्दचक्र विधानाची भक्तिमय आराधना

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/11/2026 4:20 AM

*मुनी संघाच्या मंगल सानिध्यात धार्मिक विधी; आचार्य विद्यासागर महाराज यांचे प्रवचन*

कुपवाड : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल) येथे आयोजित श्री सिद्धोत्सव आराधना व विश्वशांती महायाग महोत्सवांतर्गत २४ सिद्धशिलांसहित भव्य सिद्धचक्र महामंडल विधानाचे धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडत आहेत. आगम चक्रवर्ती युवाचार्य विद्यासागरजी महाराज, परमपूज्य धर्मसागरजी महाराज, परमपूज्य आगमसागरजी महाराज, परमपूज्य प्रशांतसागरजी महाराज, परमपूज्य अजितसागरजी महाराज, परमपूज्य निर्लोभसागरजी महाराज आणि परमपूज्य चैत्यसागरजी महाराज यांच्या मंगल सानिध्यात विविध धार्मिक पूजा, विधी व अनुष्ठान संपन्न होत आहेत.

बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) सकाळी सात वाजता राजा श्रीपाल सुकुमार पाटील व मैना सुंदरी सौ.त्रिशला पाटील यांचे मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने मंडपात आगमन झाले. त्यानंतर जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. सकाळी श्री सिद्धचक्र विधानातील 16 अर्घ्य आज पार पडले.तसेच भगवानांचा पंचामृत अभिषेक, शांतिधारा, यंत्राभिषेक तसेच चक्रवर्ती द्वारे विशेष पूजा करण्यात आली. जिनमंदिरामध्ये यागमंडल विधानाचे धार्मिक विधीही भक्तिभावाने पार पडले.

यावेळी आगम चक्रवर्ती युवाचार्य विद्यासागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले. आपल्या प्रवचनातून त्यांनी धर्म, अध्यात्म, संयम, अहिंसा आणि आत्मकल्याणाचे महत्त्व विशद केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला.

दुपारी तीन वाजता मंगल प्रवचनानंतर धनपतीद्वारे रत्नवृष्टी आणि होमहवनाचे धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी सहा वाजता  जिनशास्त्र मिरवणूक काढण्यात आली. रात्री सात वाजता जाप्य, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आचार्य विद्यासागर मुनी संघाच्या मंगल सानिध्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सिद्धचक्र महामंडल विधानाच्या माध्यमातून भाविकांना धार्मिक साधना, आत्मचिंतन आणि आध्यात्मिक अनुभूती घेण्याची संधी मिळत आहे.

या महोत्सवाचे आयोजन श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल), कुपवाड, यांच्यावतीने करण्यात आले आहे. तर संयोजन कुपवाडमधील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मोठी, आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, दिगबर जैन सेवा समिती, सुधर्मसागर सागर मुनी महाराज प्रतिष्ठान, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, समस्त दिगंबर जैन समाज आणि विविध सामाजिक संस्था व मंडळाच्या संयुक्त सहभागातून करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या