पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून जनतेला दर्जेदार सेवा देण्यावर भर - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/11/2026 8:42 AM

नांदेड :-  कंधारच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि स्वर्गीय शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यानाचे लोकार्पण आज झाले. इतिहासाचा अभिमान बाळगतानाच भविष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, हीच विकासाची खरी संकल्पना आहे. या माध्यमातून जनतेला दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज कंधार येथे केले.

कंधार येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर श्री शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्रीमती पवार बोलत होत्या. या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रूपा राऊळ आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, श्रेणीवर्धित 100 खाटांच्या नवीन उपजिल्हा रुग्णालय इमारतीमुळे कंधार आणि परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाची इमारत आधुनिक होण्यासोबतच आरोग्यसेवाही दर्जेदार व्हावी, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि गरीब रुग्णांना सन्मानाने व आपुलकीने वागणूक मिळावी, यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीतून लोकाभिमुख कामकाज होऊन सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, त्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत आणि वेळेत सेवासुविधांसह सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी व्यक्त केली.

राज्यातील बहुतांश भागांत कमी पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तातडीच्या मदतीसोबतच दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला जात असून, त्यासाठी जलसंधारणाची कामे, पाणी साठवण, भूजल पातळी वाढवणे आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन यावर शासनाचा विशेष भर राहील. या परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी आणि पशुधन यापैकी कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिली.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, याचाच एक भाग म्हणून कंधार येथे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय इमारत उभी राहिली आहे. यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील. तसेच, शासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना तत्पर सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, प्रोत्साहनपर अनुदान वितरणाबाबत लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये अपेक्षित असलेल्या सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचा टप्पा कंधार उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाने सुरू झाला आहे. या इमारतीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आणि या अनुषंगाने लवकरच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येईल. तत्पर आरोग्य सेवा देऊन प्रशासन गतिमान करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, राज्यातील सर्वात अद्ययावत रुग्णालय कंधार येथे उभारले गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने कंधार व लोहा तालुक्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणाला मोठी मदत केली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाची सुसज्ज इमारत नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्याने कामकाजात गतिमानता येईल. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनीही भरघोस निधी देऊन या भागाच्या विकासाला गती दिली होती. कंधार व लोहा परिसरातील प्रलंबित विकासकामांचा उल्लेख करून त्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी केले. यावेळी त्यांनी उद्घाटन झालेल्या तिन्ही विकासकामांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात विजय होकर्णे निर्मित मन्याडचा तीरावर आरोग्य सेवेचा मानबिंदू या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. 

Share

Other News

ताज्या बातम्या