धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून २४ नोव्हेंबरला २६ वा गोदावरी गंगापूजन सोहळा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/11/2026 12:30 AM

नांदेड : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भारतीय संस्कृती, परंपरा आणि नदीपूजनाचे महत्त्व अधोरेखित करणारा नांदेडचा मानबिंदू असलेला २६ वा गोदावरी गंगापूजन सोहळा मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नगीना घाट, नांदेड येथे आयोजित करण्यात असून मोरपंखी साडी परिधान करून वेळेवर आलेल्या पहिल्या पाच हजार महिलांना लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या तर्फे विशेष बक्षीस तसेच द्रोण, दिवे व फुले मोफत देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, महानगराध्यक्ष आ. अमर राजूरकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व ॲड. चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, जिल्हा सरचिटणीस विजय येवणकर, शीतल खांडील, विजय गंभीरे, सुषमा थोरात यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या उपक्रमाला दरवर्षी हजारो महिला व नागरिकांची उपस्थिती लाभते.गेल्या वर्षी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या सोहळ्याची नोंद झाली आहे. 

आकर्षक पूजेची थाळी सजविणाऱ्या एकवीस महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. हजारो महिला एकाच वेळी गोदावरीची आरती करणार असून, आपल्या परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी नदीपात्रात हजारो दिवे सोडण्यात येणार आहेत.नयनरम्य रोषणाई आणि भव्य विद्युत सजावटीमुळे नगीना घाट परिसर उजळून निघणार आहे. यावेळी कुबेरनगरी, लोंढेसांगवी यांच्या तर्फे भव्य आतषबाजी, संस्कार भारतीच्या वतीने भव्यदिव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. हरिद्वार आणि वाराणसीनंतर भव्यतेच्या बाबतीत जगातील तृतीय क्रमांकाची नांदेडची गंगा आरती म्हणून या सोहळ्याची ओळख निर्माण झाली आहे.

गोदावरी गंगापूजनाची महती देशभर पोहोचविणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे. अंदमान, गुजरात, गोवा, काश्मीर, गंगासागर, उत्तर प्रदेश, केरळ आणि नेपाळ यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्या नांदेडकरांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे. याशिवाय भाजपचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा आणि मायची ऊब या सामाजिक उपक्रमांच्या देणगीदारांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

संतोषगुरू परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने गोदावरी पूजन होणार असून, सालासार भजन मंडळातर्फे सांगित्यिक आरती सादर करण्यात येणार आहे. गुरुद्वारा लंगरसाहेब यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य उपक्रम अधिकाधिक नांदेडकरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवावा, असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या