अल्पसंख्याक समाजातील तरुणांना पोलीस भरतीपूर्व निवासी प्रशिक्षणाची संधी ; प्रशिक्षण संस्थांकडून अर्ज मागविले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/11/2026 9:01 AM

नांदेड  :- अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी राज्यातील अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक व पात्र नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शासन निर्णय १७ डिसेंबर २०२१ मधील तरतुदीनुसार जिल्हानिहाय किमान २५ ते कमाल ५० प्रशिक्षणार्थींची निवड करून त्यांना तीन महिन्यांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये अंकगणित, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी भाषा व व्याकरण तसेच शारीरिक क्षमता या विषयांचा समावेश राहणार आहे. पोलीस शिपाई भरतीच्या लेखी व शारीरिक परीक्षांसाठी उमेदवारांना सक्षम बनविणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

*प्रशिक्षण संस्थांसाठी पात्रता व आवश्यक सुविधा*
अर्ज करणारी प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेला शिकवणी किंवा प्रशिक्षणाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. संस्थेकडे अनुभवी प्राध्यापक, प्रशिक्षक, बी.पी.एड. पदवीधारक शारीरिक प्रशिक्षक, वर्गखोल्या, ग्रंथालय, वाचनालय, स्वच्छतागृहे आणि खेळाचे मैदान उपलब्ध असणे आवश्यक आहे.

याशिवाय ५० प्रशिक्षणार्थींसाठी पुरेशी निवास व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था तसेच महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र निवास खोल्या व स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा असणे बंधनकारक आहे. निवासी प्रशिक्षणादरम्यान विशेषतः महिला प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना संस्थांनी करणे आवश्यक आहे.

*५० प्रशिक्षणार्थींसाठी १२ लाख २ हजार ५०० रुपयांचे अनुदान*
निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थेला ५० प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणासाठी एकूण १२ लाख २ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानामध्ये निवास व्यवस्था, अभ्यास साहित्य, शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण, अल्पोपहार, भोजन तसेच गणवेश साहित्याचा खर्च समाविष्ट आहे. अनुदानाचे वितरण तीन टप्प्यांत करण्यात येणार असून, प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर ५० टक्के, दोन महिन्यांनंतर २५ टक्के आणि प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष पोलीस भरतीच्या शारीरिक किंवा लेखी परीक्षेला उपस्थित झाल्याचा पुरावा सादर केल्यानंतर उर्वरित २५ टक्के अनुदान देण्यात येईल.

*अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे*
इच्छुक संस्थांनी शासन निर्णय दिनांक १७ डिसेंबर २०२१ मधील प्रपत्र-अ नुसार संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज टंकलिखित करून सीलबंद लखोट्यात सादर करावा. अर्जासोबत संस्थेचा नोंदणी दाखला, संस्थेची नियमावली, शैक्षणिक व प्रशिक्षणविषयक कामाचा अनुभव, अनुभवी प्राध्यापक व प्रशिक्षकांची माहिती, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, निवास व भोजन सुविधांची माहिती तसेच खेळाचे मैदान स्वतःच्या मालकीचे आहे किंवा भाडेतत्त्वावर आहे, यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

अर्जाचे सीलबंद पाकीट संबंधित जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, अल्पसंख्याक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावे. पाकिटावर 'पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा निवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज' असे ठळक अक्षरांत नमूद करावे.

*३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
इच्छुक व पात्र प्रशिक्षण संस्थांनी सोमवार ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संबंधित जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, अल्पसंख्याक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज सादर करावेत.

निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थांनी निवडीनंतर १५ दिवसांच्या आत जिल्ह्यातील जास्त खपाच्या मराठी, हिंदी व उर्दू वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून तसेच समाज माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देऊन उमेदवारांकडून अर्ज मागवावेत. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना पुन्हा या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार नाही. उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी व इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार करण्यात येईल.

अंतिम निवड झालेल्या संस्थांना शासन निर्णयातील परिशिष्ट-अ नुसार १०० रुपयांच्या मुद्रांक पेपरवर विहित नमुन्यात करारनामा करावा लागेल. तसेच शासन निर्णयातील सर्व अटी, शर्ती व तरतुदींचे पालन करणे संस्थांना बंधनकारक राहील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक प्रशिक्षण संस्थांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील अल्पसंख्याक आयुक्तालयाचे आयुक्त यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या