*५०० हून अधिक श्राविकांचा विधानात सहभाग; ३२ अर्घ्यांची पूर्तता*
कुपवाड : येथील जैन मुनीगुंफा परिसरात सुरू असलेल्या श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल), कुपवाड यांच्या वतीने आयोजित सिद्धचक्र महामंडल विधान आराधना महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. २४ सिद्धशिलांसहित आयोजित या भव्य सिद्धोत्सवात ५०० हून अधिक श्राविकांनी विधानाला बसून भक्तिभावाने सहभाग घेतला. आजच्या धार्मिक विधीमध्ये ३२ अर्घ्यांची पूर्तता करण्यात आली.
तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता राजा श्रीपाल व मैना सुंदरी यांच्या मंगल वाद्यघोषासह निर्वाणिक मंडपात मंगल आगमन आणि हंतीवरुन जलकुंभ मिरवणुकीने झाली. सकाळी ८ वाजता श्री सिद्धचक्र विधानाचे 32 अर्घ्य, भगवंतांचा पंचामृत अभिषेक, शांतिधारा, यंत्राभिषेक तसेच विशेष पूजाविधी करण्यात आले.
*ध्यानधारणेचा मंगलमय उपक्रम*
आगम चक्रवर्ती आचार्य परमपूज्य १०८ विद्यासागर महाराज यांच्या सान्निध्यात ध्यानधारणेचा मंगलमय उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमात ५00 हून अधिक श्रावक-श्राविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ध्यानधारणा केली आणि आध्यात्मिक अनुभव घेतला. या उपक्रमातून मनःशांती, आत्मचिंतन आणि आध्यात्मिक साधनेचा संदेश देण्यात आला.
दुपारी ३ वाजता आचार्य श्री विद्यासागर महाराज व त्यागींचे मंगल प्रवचन, धनपतीद्वारे रत्नवृष्टी तसेच होम-हवनाचे धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी ६ वाजता धर्मध्वजा घेऊन मिरवणूक काढण्यात आली. रात्री ७ वाजता जप, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.दरम्यान, कर्मवीर पतसंस्थेच्या अध्यक्षा भारती चोपडे यांनी विधानस्थळी भेट देऊन धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
या सिद्धचक्र महामंडल विधानाचे आयोजन श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल), कुपवाडचे अध्यक्ष नेमिनाथ बोरगावे, उपाध्यक्ष सचिन नरदेकर, सचिव कुमार लोकापुरे, खजिनदार रायगोंडा पाटील तसेच संचालक बाळासाहेब पाटील, निखिल कर्वे, कुलभूषण कर्नाळे, रवींद्र पाटील, अविनाश गौंडाजे, शीतल पाटील व अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
यामध्ये श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (मोठे)चे अध्यक्ष नरसगोंडा पाटील व ट्रस्टी, श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व ट्रस्टी, दिगंबर जैन सेवा समितीचे अध्यक्ष सागर खोत व ट्रस्टी, सुधर्मसागर सागर मुनी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद गौंडाजे व सर्व संचालक, वीर सेवा दल वीर महिला मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सर्व सभासद-संचालक तसेच कुपवाडमधील सर्व सामाजिक संस्था, मंडळे यांच्या संयुक्त सहकार्याने या धार्मिक महोत्सवाचे संयोजन करण्यात येत आहे.
कुपवाड येथील जैन मुनीगुंफा परिसरात सुरू असलेल्या या धार्मिक महोत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विविध धार्मिक कार्यक्रमांना जैन समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.