जैन धर्माची उच्च विचाधारा सर्व समाजापर्यंत पोहोचविणे काळाची गरज : मा. खासदार राजु शेट्टी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/11/2026 6:27 AM

*कुपवाडमध्ये सिद्धचक्र आराधना महोत्सवात धार्मिक कार्यक्रम उत्साहात*

कुपवाड : जग आणि जगू द्या, हा उदात्त विचार जैन धर्माने संपूर्ण जगाला दिला आहे. जगात अनेक धर्म आणि त्यांचे संस्थापक आहेत; मात्र मानवता, अहिंसा, सहअस्तित्व आणि सर्व जीवांना जगण्याचा अधिकार देणारी उच्च विचारधारा जैन धर्मातून पुढे आली आहे. पृथ्वीतलावरील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, ही शिकवण जैन धर्म देतो. जैन धर्माचे हे उच्च विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित न राहता सर्व समाजापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

कुपवाड येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल) आयोजित श्री सिद्धोत्सव आराधना व विश्वशांती महायाग महोत्सवांतर्गत शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) आयोजित धार्मिक कार्यक्रमात ते बोलत होते. धर्मकार्य हे केवळ काही व्यक्तींचे नसून त्यामध्ये कार्यकर्त्यांसह समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. सर्वांच्या सामूहिक सहभागातूनच धार्मिक आणि सामाजिक कार्याला व्यापक स्वरूप प्राप्त होते. धर्मातील चांगले विचार आचरणात आणून ते समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

या महोत्सवाला जैन बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ७ वाजता राजा श्रीपाल व मैना सुंदरी यांचे मंगल वाद्यघोषात मंडपात आगमन झाले. तसेच हत्तीवरून जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. सकाळी ८ वाजता श्री सिद्धचक्र विधानाच्या अर्घ्यांद्वारे भगवंतांचा पंचामृत अभिषेक, शांतिधारा, यंत्राभिषेक तसेच चक्रवर्तींद्वारे विशेष पूजाविधी करण्यात आले.

यावेळी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या प्रवचनातून धर्म, अहिंसा, संयम आणि आत्मकल्याणाचा संदेश देण्यात आला. मनुष्याने जीवनात सदाचार, त्याग, तपश्चर्या आणि परोपकाराची भावना जोपासावी. केवळ बाह्य धार्मिक विधींपेक्षा मनाची शुद्धता आणि विचारांची निर्मळता महत्त्वाची असून, प्रत्येकाने आत्मचिंतन करून आपल्या आचरणात सकारात्मक बदल घडवावा, असा संदेश प्रवचनातून देण्यात आला.

दुपारी ३ वाजता धनपतीद्वारे रत्नवृष्टी, होम-हवन आदी धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी ६ वाजता धर्मध्वजा घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली.

रात्री आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात कवलापूरच्या वीर महिला मंडळाने 'पंत वाद' या विषयावर नृत्य सादर केले. वीर महिला मंडळ, कवठेसार यांच्या वतीने 'नमो नमो' आणि 'शिंपल्यातील नृत्य' हा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. तर कळंबीच्या जिनवाणी महिला मंडळाने आकर्षक दीप नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. तिन्ही महिला मंडळांच्या कलाविष्कारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

रात्री भगवंतांच्या मंगल आरतीने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. कुपवाडमधील श्रावक-श्राविका आरतीच्या भक्तिरसात तल्लीन झाले. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात दिवसातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता झाली.

या महोत्सवातून अहिंसा, विश्वशांती, सहअस्तित्व आणि मानवतेचा संदेश दिला जात असून, धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक उपक्रमांमुळे कुपवाड परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या