नांदेड :- प्रकाश, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम असलेला त्रिपुरारी (कार्तिकी) पौर्णिमेचा पवित्र उत्सव यंदा २४ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या मंगलपर्वाचे औचित्य साधून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने यंदाही राज्यभर भव्य लक्षदीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे हे १९ वे वर्ष असून, नांदेड जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दीपोत्सवाची परंपरा अधिक व्यापक करावी, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दीपोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता प्रत्येकाने आपल्या जवळच्या मंदिरात मंदिर विश्वस्तांची पूर्वपरवानगी घेऊन दीपप्रज्वलन करावे. या माध्यमातून सामूहिक श्रद्धा, धार्मिक एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याचा महासंघाचा प्रयत्न आहे. यावर्षी एक लाख दीप प्रज्वलित करण्याचा मानस असल्याचे निखिलभाऊ लातूरकर यांनी यावेळी सांगितले.
हिंदू धर्मपरंपरेत कार्तिकी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान शिवाने त्रिपुरासुर या राक्षसाचा वध करून देवतांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस 'त्रिपुरारी पौर्णिमा' म्हणून ओळखला जातो. या दिवशी मंदिरांमध्ये दीपप्रज्वलन, दीपदान आणि विशेष पूजाअर्चा केली जाते. अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय हा या उत्सवाचा संदेश आहे.
केवळ मंदिरांनाच नव्हे, तर प्रत्येकाच्या मनालाही भक्तीच्या प्रकाशाने उजळविणारा हा दीपोत्सव ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नांदेडमधील सर्व समाजबांधवांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लक्षदीपोत्सव यशस्वी करावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर, राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रीती वडवळकर, नांदेड जिल्हाध्यक्षा भाग्यश्री कुलकर्णी, जिल्हाप्रमुख अनंत राखे,महानगराध्यक्ष केदार नांदेडकर, बालासाहेब पांडे ,सुनील रामदासी, राजेश कुलकर्णी, अपर्णा मोकाटे, सुवर्णा भोरे, यामिनी नांदेडकर यांनी केले आहे.