सांगली : स्टेशन रोड सांगली येथील लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या स्मारक परिसरात अस्वच्छता, बंद अवस्थेतील पथदिवे तसेच स्मारकाच्या देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष या बाबी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने काल सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे मा. आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे स्मारक परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी, बंद अवस्थेतील पथदिवे तातडीने सुरू करावेत, स्मारकाच्या बाजूने संरक्षक कंपाउंड उभारण्यात यावे तसेच स्मारकाची आवश्यक डागडुजी व दुरुस्ती करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
या निवेदनाची मा.महापौर व आयुक्त यांनी सकारात्मक दखल घेत लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला शहरजिल्हाध्यक्ष तथा मा. स्थायी समिती सभापती संगीता हारगे, मा. नगरसेविका तथा महिला प्रदेश सरचिटणीस ज्योतिताई आदाटे, सेवादल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महालिंग हेगडे, शहरजिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे,कुमार वायदंडे , युवती प्रदेश सरचिटणीस प्रणवी पाटील, सेवादल शहराध्यक्ष दत्ता पाटील, सरफराज शेख, अकबर शेख, आदित्य नाईक, नंदकुमार घाटगे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेत्यांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या स्मारकाचा सन्मान राखणे ही प्रशासनासह आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. स्मारकाच्या स्वच्छता, संरक्षण व सुशोभीकरणासाठी पक्षाच्या वतीने पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करण्यात असल्याचे यावेळी पदाधिकारी यांच्या कडून सांगण्यात आले.