नांदेड :- जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर पोलिसांनी कारवाई करून एकूण 40 लाख 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 30 ऑक्टोंबर 2026 रोजी प्रभारी अधिकारी मुदखेड यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे वासरी रोडवर वाहनांमधून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन एक हायवा क्रमांक MH-26 CH-2418 यास थांबवून पहाणी केली असता, वाहनामध्ये अंदाजे 05 ब्रास रेती असल्याचे आढळून आले. संबंधितांकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी / कागदपत्रांबाबत चौकशी केली असता, सदर रेतीची वाहतूक अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी पंचनामा करून हायवा क्र. MH-26 CH-2418 अंदाजे किंमत 40 लाख रुपये व त्यामध्ये 05 ब्रास रेती, किमत ₹25,000/- असा एकूण ₹40,25,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपी नामे- 1) शिओम ऊर्फ शिवम नागोराव वाघमारे, वय 21 वर्षे रा. बळीरामपूर ता. जि. नांदेड 2) संतोष सुदाम येवले, (हायवा मालक) रा. जानापुरी ता. लोहा यांचे विरुध्द मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 229/2026, कलम 303 (2),3(5) भारतीय न्याय संहिता, 2023 सह कलम 48 (7) (8) महाराष्ट्र जमिन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक भोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/गणेश कराड, पोउपनि/आकाश सरोदे, राजेश नंद, सुरेश जाधव, पोलीस अंमलदार रमेश पुणेबोईनवाड, (सर्व नेमणुक मुदखेड) यांनी पार पाडली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवणार असून नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.