सांगली, दि. 3,
शहरातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर असलेल्या नवीन पुलावरून होणाऱ्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीला 2 नोव्हेंबरपासून पुढील 30 दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 155 अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.
शहरातील गजबजलेल्या भागात शालेय विद्यार्थी, पादचारी व स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते व जड वाहनांमुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली असल्याने सार्वजनिक सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखणे अत्यंत आवश्यक आहे. शहरातील टिळक चौक, गावभाग, गणपती पेठ आणि महानगरपालिका चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग - पुलावरील जड व अवजड वाहतूक बंद राहील, अशा कालावधीत संबंधित वाहनांनी सांगलीवाडी जुना टोल नाका, नवीन पूल - बायपास रोड - शिवशंभो चौकाचा वापर करून सांगली शहरात ये-जा करावी.
या तात्पुरत्या अधिसूचनेबाबत सांगली शहरातील नागरिकांना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन किंवा इतर संबंधित घटकांना काही हरकती किंवा सूचना मांडायच्या असल्यास हा आदेश प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपले म्हणणे लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली येथे सादर करावे. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही व ही अधिसूचना अंतिम केली जाईल.
हा आदेश रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहनांना लागू राहणार नाही, असे या आदेशात नमूद आहे.