नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धार्मिक विधी आणि देवाच्या नावावर भिती दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 'उमाकांत खंडेश्वर महाराज' या भोंदूबाबाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. फरार असलेल्या या आरोपीला दिंडोरी परिसरातून अटक करण्यात आली असून त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
आश्रमात श्रद्धेपोटी गेलेल्या महिलेशी गैरवर्तन
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला येवला तालुक्यातील दत्तवाडी आश्रम येथे धार्मिक कार्यासाठी गेली होती. तेथे उपस्थित असलेला उमाकांत खंडेश्वर महाराज या स्वयंघोषित भोंदूबाबाने महिलेच्या अगतिकतेचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेतला. सुरुवातीला महिलेचा विनयभंग केल्यानंतर, पूजा आणि विधीची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
तक्रार दाखल होताच बाबा पसार; दिंडोरीतून अटक
या घटनेनंतर पीडित महिलेने धैर्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी उमाकांत खंडेश्वर महाराज फरार झाला होता. पोलीस रात्रंदिवस त्याच्या शोधात होते. अखेर तीन दिवसांपूर्वी तो दिंडोरी परिसरात ओळख लपवून बसल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून त्याला बेड्या ठोकल्या.
न्यायालयाने सुरुवातीला आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आता त्याची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईबाबतची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली.
नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या घटनांचे सत्र सुरुच
नाशिक व आसपासच्या परिसरात अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. काही काळापूर्वीच अशोक खरात नावाच्या दुसऱ्या एका भोंदूबाबाचे कारस्थान उघडकीस आले होते, ज्याने धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली महिलांचे शोषण केले होते आणि त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. ते प्रकरण ताजे असतानाच आता या नवीन घटनेमुळे अंधश्रद्धा आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.