*कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात भगूरच्या नगराध्यक्षांचा अवमान!*
*महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या दुजाभावाच्या वागणुकीवर नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांची तीव्र नाराजी!*
नाशिक : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासारख्या जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमात भगूरच्या नगराध्यक्षांना मिळालेल्या कथित अपमानास्पद वागणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी भगूरच्या नगराध्यक्ष प्रेरणा विशाल बलकवडे यांच्याशी केलेल्या वागणुकीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यासंदर्भात आयुक्तांना लेखी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांना अधिकृत पास देण्यात आला होता. आवश्यक सुरक्षा तपासणी पूर्ण करून त्या पासवर नमूद केलेल्या निर्धारित बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पोहोचल्या. मात्र, कार्यक्रमस्थळी नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवकांना विशेष आसनव्यवस्था आणि सन्मान दिला जात असताना भगूरच्या नगराध्यक्षांना आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांची ओळख विचारली. आपण भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष असल्याचे तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या ऐतिहासिक भगूर शहराचे प्रतिनिधित्व करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीदेखील त्यांना निर्धारित जागेवरून मागील बाजूस असलेल्या दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. त्यांचा पास तपासून त्यांच्या उपस्थितीबाबतही प्रश्न विचारण्यात आल्याने हा प्रकार अत्यंत अपमानास्पद असल्याची भावना नगराध्यक्षांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी त्यांच्या कुटुंबीयांसह अतिरिक्त पासची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना केवळ एकच पास देण्यात आला. या व्यवस्थेबाबतही नगराध्यक्षांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर मिळालेली वागणूक ही लोकप्रतिनिधींच्या सन्मानाला बाधा आणणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
*कुंभमेळा हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा केवळ नाशिक महानगरपालिकेचा कार्यक्रम नाही. हा संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेला सोहळा आहे.* त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना समान सन्मान व प्रतिनिधित्व मिळणे अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या नगरसेवकांना विशेष सन्मान आणि बैठक व्यवस्था देताना जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांच्या लोकप्रतिनिधींना दुय्यम वागणूक देणे योग्य नाही, अशी भूमिका नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी मांडली.
भगूर हे केवळ एक नगरपरिषद क्षेत्र नसून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले महत्त्वपूर्ण शहर आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भगूरमध्ये पर्यटकांची व भाविकांची मोठी वर्दळ अपेक्षित असताना या शहराच्या प्रतिनिधींनाच अशा प्रकारची वागणूक मिळणे ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
**“माझा आक्षेप खुर्चीला किंवा पासला नाही, तर लोकप्रतिनिधी म्हणून मिळायला हवा असलेल्या सन्मानाला आहे. नगराध्यक्ष हे पद जनतेने दिलेली जबाबदारी आहे. भगूरच्या जनतेचे प्रतिनिधित्व करताना त्या पदाचा आणि जनतेचा सन्मान राखला जाणे आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आम्ही नेहमीच आदर करतो; मात्र लोकप्रतिनिधींनाही तितकाच सन्मान मिळणे अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या बैठक व्यवस्थेबाबत काही अडचण किंवा संभ्रम असेल तर तो नम्रपणे आणि योग्य पद्धतीने सोडवता आला असता. कुंभमेळ्यासारख्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात कोणत्याही लोकप्रतिनिधीशी असा दुजाभाव होऊ नये,” असे नगराध्यक्ष प्रेरणा विशाल बलकवडे यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन साहेब, विभागीय आयुक्त श्री. प्रवीण गेडाम साहेब तसेच नाशिक जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद साहेब ,महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना लेखी पत्र देऊन आपली नाराजी नोंदवली आहे. भविष्यात कुंभमेळ्याच्या सर्व कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींना समान सन्मान, योग्य प्रतिनिधित्व आणि सन्मानजनक बैठक व्यवस्था देण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.