नांदेड : सन 2026 च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रीम मदत देण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत जमा करण्यात येणार आहे. या अग्रीम मदत रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारच्या कर्जाची अथवा तत्सम स्वरूपाची वसुली किंवा कपात करू नये, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना शेती व कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने शासनाकडून अग्रीम अनुदान देण्यात येत आहे. या मदतीचा संपूर्ण लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या अग्रीम मदत रकमेतून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली अथवा अन्य कपात करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी या निर्देशांची गंभीरतेने दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारी अग्रीम मदत कोणत्याही कपातीशिवाय पात्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.