शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करा;विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संधी;इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/11/2026 9:13 AM

नांदेड : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी दि. 10 डिसेंबर 2026 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व्यवस्था तसेच शैक्षणिक साहित्याकरिता त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट आर्थिक सहाय्य वितरित करण्यात येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत मिळते.

जिल्ह्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या तसेच पदवी व पदव्युत्तर स्तरावरील व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही गुणवत्तेनुसार किंवा वसतिगृहातील प्रवेश क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जाणार आहेत.

पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत संबंधित कार्यालयाकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या