स्वच्छतेसाठी गाव एकवटले; हजारो हातांच्या सहभागातून काही क्षणांत कोळगाव झाले स्वच्छ;मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामस्वच्छता मोहीम; लोकसहभागातून स्वच्छतेचा दिला संदेश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/11/2026 3:45 AM

नांदेड :- स्वच्छतेसाठी संपूर्ण गाव एकवटले, हातात झाडू, टोपले आणि फावडे घेऊन ग्रामस्थ स्वच्छतेच्या कामाला लागले आणि पाहता पाहता गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ झाला. लोकसहभाग व श्रमदानाच्या बळावर ग्रामस्वच्छतेचे प्रभावी उदाहरण भोकर तालुक्यातील कोळगाव बुद्रुक येथे पाहायला मिळाले.
      पंचायत समिती भोकर, सेवा समर्पण परिवार व ग्रामपंचायत कोळगाव बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य अभियानांतर्गत ग्रामस्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.
     यापूर्वी पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात लोकसहभागाच्या बळावर कोळगाव बुद्रुकने पारितोषिक पटकावले होते. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्यासाठी गाव पुन्हा एकदा एकजुटीने सज्ज झाले आहे. याच भावनेतून ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. शिवस्थळ, मंदिर परिसरासह गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. अवघ्या दोन तासांत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि सामूहिक श्रमदानातून स्वच्छतेचा हा उपक्रम यशस्वी झाला.
     या मोहिमेत सुभाष पाटील कोळगावकर, सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष दिगंबरराव देशमुख, विठ्ठल फुलारी, जिल्हा परिषदेचे मिलिंद व्यवहारे, संदीप देशमुख, विठ्ठल तुप्पेकर, राजेश लांडगे, सुधाकर देशमुख, अनिल जाधव, विस्तार अधिकारी एस.टी. शेटेवाड, जी.एस. गोणशेटवार, गोविंद तमलवाड, राधाबाई पाणेवार, कैलास गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे गुलाब वडजे, बालाजी इंगळे, नरेंद्र काळे, बालाजी कनोजवार, यमुना नुनुंचे, कमल दासरे, सविता सरवले, मुख्याध्यापक सुनील पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नारायण खानसोळे, गट समन्वयक प्रदीप वाठोरे यांच्यासह पंचायत समितीचे ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
     यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांनी गीताच्या माध्यमातून हात धुण्याच्या योग्य पद्धती आणि त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. गावाची स्वच्छता नियमितपणे सुरू राहावी यासाठी ग्रामस्थांनी स्वच्छतेचा संकल्प केला. लोकसहभाग, श्रमदान व सामूहिक जबाबदारीच्या बळावर गावाचा कायापालट करता येतो, याचे प्रत्यंतर कोळगाव बुद्रुकने पुन्हा एकदा दाखवून दिले.
आठवड्यातून एक दिवस एका गावात ग्रामस्वच्छता मोहीम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भोकर तालुक्यात आठवड्यातून एक दिवस एका गावात ग्रामस्वच्छता उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला सेवा समर्पण परिवाराचीही साथ मिळत आहे. तालुक्यातील गावे स्वच्छ व समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या