महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार;योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष उपक्रम;लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/11/2026 9:10 AM

नांदेड : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्यामार्फत विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण आणि योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षण राबविण्यात येणार असून, संबंधित लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महामंडळाची स्थापना 10 जुलै 1978 रोजी झाली असून, मागासवर्गीय समाजातील घटकांचे सामाजिक व आर्थिक उत्थान करणे, त्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा महामंडळाचा प्रमुख उद्देश आहे. या उद्देशपूर्तीसाठी महामंडळामार्फत विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येतात.

या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश महामंडळाच्या योजनांमधून कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची सद्यस्थिती जाणून घेणे हा आहे. कर्जाचा वापर कोणत्या व्यवसायासाठी करण्यात आला, व्यवसायाची सध्याची स्थिती काय आहे, रोजगार व उत्पन्नात किती वाढ झाली, लाभार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत कोणते बदल झाले तसेच कर्ज परतफेडीची सद्यस्थिती काय आहे, याबाबत माहिती संकलित करण्यात येणार आहे. याशिवाय व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, व्यवसायाची प्रगती आणि योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींचाही अभ्यास केला जाणार आहे.

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि. 13 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार M/s. PriMove Infrastructure Development Consultants Pvt. Ltd. या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या नियुक्त प्रतिनिधींकडून लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे.

सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे महामंडळाच्या विविध योजनांची परिणामकारकता तपासणे, योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलांचे मूल्यांकन करणे आणि भविष्यातील योजनांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. तसेच लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांनी नियुक्त प्रतिनिधींना योग्य व अचूक माहिती देऊन सर्वेक्षणात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या