मराठी पत्रकार संघ मुदखेड तालुक्याच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा;सामाजिक एकात्मता आणि व्यसनमुक्तीचा संदेश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/11/2026 9:01 AM

नांदेड:- भारतीय संविधान दिनानिमित्त मराठी पत्रकार संघ,मुदखेड तालुका यांच्या वतीने संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत संविधानाने दिलेले हक्क, अधिकार आणि कर्तव्यांचे प्रत्येक नागरिकाने पालन करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते ॲड.विष्णू नारायण गोडबोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, न्याय,स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मूलभूत संदेश दिला आहे.या घटनात्मक मूल्यांचे केवळ वाचन न करता प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरण केले पाहिजे. समाजातील जातिभेद, जातीप्रथा आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी आणि न्याय मिळाल्यास राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत होईल. तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून एकमेकांना सहकार्य केल्यास समाजातील प्रत्येक व्यक्तीला जागतिक स्तरावर प्रगती करण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे जाती-पातीच्या भिंती बाजूला ठेवून सर्वांनी माणुसकी, बंधुता आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही ॲड. गोडबोले यांनी केले.
संविधान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता संविधानातील विचार आणि मूल्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे,असा संदेश यावेळी देण्यात आला.
मराठी पत्रकार संघाचे संजय कोलते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला सीआरपीएफचे अधिकारी,मुदखेड तालुक्यातील शासकीय वैद्यकीय अधिकारी,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,पोलीस विभागातील अधिकारी, पोलीस स्टेशनचे कराड साहेब तसेच मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी,पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
संविधानाचे महत्त्व,सामाजिक समता,बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Share

Other News

ताज्या बातम्या