नांदेड :- पाण्याचा कार्यक्षम वापर करून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)’ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच उभारणीसाठी एकूण 90 टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देय आहे. लाभासाठी कमाल क्षेत्र मर्यादा पाच हेक्टर आहे. याशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देण्यात येते. त्यामुळे अनुक्रमे 80 व 75 टक्के अनुदानाचा लाभ मिळतो. अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून अतिरिक्त 10 टक्के, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अतिरिक्त 15 टक्के अनुदान देण्यात येते. या सर्व योजनांच्या एकत्रित लाभातून संबंधित प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना कमाल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते.
इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावेत. यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज स्वीकारताना ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ हे तत्त्व लागू राहणार आहे. अर्ज सादर करताना अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, बँक पासबुक आणि जातीचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जातील सर्व माहिती अचूक भरावी; चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व योजनेच्या लाभाबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सामूहिक सेवा केंद्रात (सीएससी) किंवा सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. पाण्याची बचत, सिंचनाची कार्यक्षमता आणि शेती उत्पादनात वाढ साधण्यासाठी या विशेष मोहिमेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.