नांदेड : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वावर भारतीय संस्कृती, नदीसंस्कृती आणि धार्मिक परंपरेचा जागर करणाऱ्या नांदेडच्या मानबिंदू असलेल्या २६ व्या गोदावरी गंगापूजन सोहळ्याची नगीना घाट येथे जय्यत तयारी सुरू आहे. मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हा भव्य सोहळा संपन्न होणार असून लायन्स क्लबचे प्रांतपाल राहुल औसेकर हे आपल्या संपूर्ण टीमसह उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
हजारो महिला आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा उत्सव दिमाखात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोरपंखी साडी परिधान करून वेळेवर उपस्थित राहणाऱ्या पहिल्या पाच हजार महिलांना लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या वतीने विशेष भेट देण्यात येणार आहे. तसेच पूजेसाठी द्रोण, दिवे आणि फुले मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आकर्षक पूजेची थाळी सजविणाऱ्या २१ महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या संयोजनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व ॲड. चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, भाजपा जिल्हा सरचिटणीस विजय येवणकर, शीतल खांडील, विजय गंभीरे आणि सुषमा थोरात,नगरसेवक डिम्पल नवाब ,तुलजेश यादव, सुमित मुथा, नगरसेविका प्रभाबाई यादव, अमृता ठाकूर, रुची भारतीया, मनप्रीतकौर कुंजीवाले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
हजारो महिला एकाच वेळी गोदावरी मातेची आरती करणार असून, आपल्या कुटुंबीयांच्या दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीसाठी नदीपात्रात हजारो दीप सोडण्यात येणार आहेत. नगीना घाट परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि दीपसजावट करण्यात येत आहे. कुबेरनगरी, लोंढेसांगवी यांच्या वतीने भव्य आतषबाजी करण्यात येणार असून, संस्कार भारतीच्या वतीने भव्य रांगोळी साकारली जाणार आहे.
गेल्या वर्षी या सोहळ्याची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. हरिद्वार आणि वाराणसीनंतर भव्यतेच्या बाबतीत जगातील तृतीय क्रमांकाची नांदेडची गंगा आरती म्हणून या सोहळ्याची ओळख निर्माण झाली आहे.गोदावरी गंगापूजनाची महती देशभर पोहोचविणाऱ्या पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अंदमान, गुजरात, गोवा, काश्मीर, गंगासागर, उत्तर प्रदेश, केरळ आणि नेपाळ यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्या नांदेडकरांचाही सन्मान करण्यात येणार आहे. भाजपचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा आणि मायची ऊब या सामाजिक उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचाही गौरव करण्यात येणार आहे.
संतोषगुरू परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने गोदावरी पूजन होणार असून, सालासार भजन मंडळातर्फे सांगीतिक आरती सादर करण्यात येणार आहे. गुरुद्वारा लंगरसाहेब यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या २६ वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम केवळ धार्मिक सोहळा नसून गोदावरी नदीप्रती कृतज्ञता, भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी चळवळ बनला आहे. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू असून, अधिकाधिक नांदेडकरांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.