कुपवाडमध्ये बटूंचा मौजीबंधन संस्कार, ५०० हून अधिक लेकींचा सन्मान

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/11/2026 6:01 AM


*संस्कार ही काळाची गरज; मुलांना संपत्तीपेक्षा उत्तम संस्कार द्या – आचार्य विद्यासागर महाराज*

कुपवाड : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल) आयोजित मुनी गुंफा येथे सुरू असलेल्या श्री सिद्धचक्र महामंडल विधान महोत्सवांतर्गत रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. सकाळी राजा श्रीपाल व मैना सुंदरी यांचे मंगल वाद्यघोषात मंडपात आगमन व हत्तीवरून जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सकाळी आठ वर्षांवरील बटूंचा मौंजीबंधन संस्कार (उपनयन संस्कार) विधी आचार्य विद्यासागर महाराज व मुनी संघ यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी बटूंना अष्टमूलगुणांचे नियम देण्यात आले. त्यांच्या डोक्यावर पुष्पक्षेपण करून बीजाक्षर मंत्रांचे विधी करण्यात आले. तसेच श्री सिद्धचक्र विधानातील भगवंतांचा पंचामृत अभिषेक, शांतिधारा, यंत्राभिषेक व चक्रवर्तींद्वारे विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व बटूंची कुपवाड शहरातून रथामधून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी आचार्य विद्यासागर महाराज यांनी बटू व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना संस्कारांचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, संस्कार ही काळाची गरज आहे. आज मुलांना भरपूर संपत्ती देण्याऐवजी उत्तम संस्कार द्या. आज संस्कार दिले नाहीत, तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही. पालकांनी मुलांना मंदिराचा मार्ग दाखवला नाही, तर हीच पिढी भविष्यात तुम्हाला वृद्धापकाळात वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मुलांसमोर उच्च आदर्श व मूल्ये आपण सर्वांनी ठेवली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

*कुपवाडच्या ५०० हून अधिक लेकींचा अनोखा सन्मान सोहळा!*

दुपारी मुख्य सभा मंडपात ‘माझं माहेर, माझा स्वाभिमान, माझा अभिमान’ या विशेष कार्यक्रमांतर्गत कुपवाडमधील पाचशेहून अधिक लेकींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कुपवाडच्या सुनांनी कुपवाडच्या लेकींची ओटी भरून त्यांचा सन्मान केला. यावेळी लेकींना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. माहेरच्या मायेचा आणि लेकिंच्या सन्मानाचा अनोखा सोहळा यावेळी रंगला. माहेर आणि लेकींच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम व आपुलकी या उपक्रमातून व्यक्त झाली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आचार्य विद्यासागर महाराज यांनी कुपवाडच्या लेकींना मार्गदर्शन केले. तसेच कुपवाडच्या काही लेकीने मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांच्या सन्मानाने त्या भारावून गेल्या होत्या.

दरम्यान दुपारी त्यांगीचे मंगल प्रवचन,धनपती द्वारे रत्नवृष्टी, होम हवन असे धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी धर्मध्वजा घेऊन मिरवणूक काढण्यात आली. रात्री जप, सांस्कृतिक कार्यक्रम व आरतीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

Share

Other News

ताज्या बातम्या