पुण्यसंचयातून मोक्षमार्गाचा लाभ, धर्मआराधनेतून आत्मकल्याण साधा : आचार्य विद्यासागर महाराज

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/11/2026 6:14 AM

*सरस्वती संस्कार उपक्रमात ५० हून अधिक मुलामुलींचा सहभाग; उद्या मौंजीबंधन व कुपवाडच्या ५०० लेकींचा होणार सन्मान*


कुपवाड : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल) येथे सुरू असलेल्या सिद्धचक्र आराधना व विश्वशांती महायाग महोत्सवात शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) आचार्य विद्यासागर महाराज यांनी पुंण्याचे महत्त्व आणि त्याच्या सामर्थ्यावर मार्गदर्शन केले. पुंण्याचे सामर्थ्य अपरंपार आणि अलौकिक असल्याचे सांगत, पूर्वजन्मातील पुंण्यानुबंध आणि संचित पुंण्य आपल्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जाते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रवचनात आचार्य श्री म्हणाले, सम्यकत्वातून किंवा जैन धर्माच्या आराधनेतून अर्जित केलेले पुण्य तात्काळ अथवा कालांतरानेही आत्मकल्याण आणि मोक्षप्राप्तीसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे प्रत्येकाने वर्तमान जीवनात सातत्याने पुंण्य अर्जित केले पाहिजे. ज्ञानप्राप्तीसाठी दररोज थोडा वेळ स्वाध्याय करणे आवश्यक आहे. आपल्याला धर्मआराधक व्हायचे आहे, धर्मांध व्हायचे नाही. त्यासाठी धर्माला शरण जाऊन श्रद्धा, विवेक आणि संयमाने धर्माचरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

*सरस्वती संस्कार उपक्रमात ५० हून अधिक मुला मुलींचा सहभाग*

महोत्सवांतर्गत दुपारी आयोजित सरस्वती संस्कार उपक्रमात ५० हून अधिक मुलामुलींनी सहभाग नोंदवला. या उपक्रमातून मुलांची एकाग्रता, एकनिष्ठता, आत्मविश्वास आणि साधना करण्याची क्षमता कशा प्रकारे वाढवावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलांमुलीमध्ये संस्कार, शिस्त आणि ज्ञानार्जनाची आवड निर्माण करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

महोत्सवाच्या सकाळच्या सत्रात आचार्य श्रींच्या मार्गदर्शनाखाली मंगल जाप्य अनुष्ठान करण्यात आले. यामध्ये ५०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. तसेच सिद्धचक्र विधानातील अर्घ्य, भगवंतांचा पंचामृत अभिषेक, शांतिधारा, यंत्राभिषेक आणि चक्रवर्ती द्वारे विशेष पूजा असे धार्मिक विधी पार पडले.

दरम्यान, शुक्रवारी रात्री चांदीच्या दिव्यांनी दीपार्चन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. विद्यासागर ग्रुप, मजरेवाडी यांनी पंचकल्याण गीत सादर केले. कुपवाड पाठशाळेतील मुला-मुलींनी विविध कलाविष्कार सादर केले. वीतराग ग्रुप, वाळवा यांनी दांडिया नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तर आज राजा श्रीपाल आणि मैना सुंदरी यांच्या जीवनावर आधारित भव्य नाट्यप्रयोग सादर झाला.

*उद्या मौजी बंधन सोहळा; ५०० लेकींचा होणार सन्मान*

महोत्सवांतर्गत उद्या, रविवार (दि. २२ नोव्हेंबर) रोजी सकाळी ७.३० वाजता मौजी बंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 'माझं माहेर, माझा स्वाभिमान, माझा अभिमान' हा कुपवाडच्या लेकींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कुपवाड गावच्या ५०० लेकींचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, आचार्य विद्यासागर महाराज यांचे लेकींना मार्गदर्शन लाभणार आहे.

धार्मिक आराधना, आध्यात्मिक प्रवचन, संस्कार उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सिद्धचक्र आराधना महोत्सवात उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या