नांदेड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेन्द्र के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार १२ डिसेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत.
न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे आपसी सामंजस्याने मिटविण्याची ही पक्षकारांना पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे. दोन्ही पक्षकारांनी परस्पर सहमतीने तडजोड करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा अमूल्य वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होईल. तसेच परस्पर संमतीने वाद मिटल्यामुळे दोन्ही पक्षांतील हितसंबंध कायम राहण्यास मदत होईल.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, चेक बॉन्स, बॅंक रिकव्हरी, लोन रिकव्हरी, सक्सेशन, मोटार अपघात, ट्रॅफिक चालान, सर्व्हीस मॅटर, लेबर डिस्प्युट, जमीन संपादन, महसूल, लाईट बिल, महानगरपालिका किंवा नगरपरिषद यांची पाणीपट्टी, घरपट्टी, टेलिफोन बिल, वैवाहिक वाद, कौटुंबिक वाद, व्यावसाईक वाद, लवाद, ग्राहकांचे वाद, कामगारांचे वाद, दिवाणी प्रकरणे, वारसाहक्काची प्रकरणे तसेच मध्यस्थी किंवा तडजोडयोग्य असलेली न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटविण्यात येणार आहेत.
संबंधित पक्षकारांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित आहेत, त्या न्यायालयाच्या परिसरात १२ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा आणि आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी केले आहे. या लोकअदालतीसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड अथवा जवळच्या न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा.