नांदेड - मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० च्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधत नांदेड जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्याचा निर्धार जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामविकास यंत्रणेने जिल्हास्तरीय कार्यशाळेत व्यक्त केला. अभियानातील निकष व गुणांकनानुसार प्रत्येक गावात नियोजनबद्ध कामे करून ग्रामपंचायतींचा कायापालट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
नांदेड जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील डौर येथील नंदीग्राम पर्यटन केंद्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतींनी अभियानातील प्रत्येक निकषाचा सखोल अभ्यास करून गुणांकनाच्या दृष्टीने आवश्यक कामांचे नियोजन करावे. गावातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, कर वसुली, डिजिटल प्रशासन आणि लोकसहभाग या बाबींमध्ये ठोस सुधारणा घडवून आणाव्यात. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी ग्रामपंचायतींना आवश्यक सहकार्य करून परस्पर समन्वयातून गावांच्या विकासाला गती द्यावी. प्रत्येक गावात प्रत्यक्ष बदल दिसेल, अशा पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गावपातळीवर काम करताना येणाऱ्या विविध अडचणी आणि समस्या मांडल्या. ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजातील अडथळे, नोंदींचे डिजिटलायझेशन, कर वसुली आणि अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात उपस्थितांनी चर्चा केली. यावेळी गाव नमुना क्रमांक आठचे डिजिटलायझेशन करण्याच्या प्रक्रियेवर भर देण्यात आला. तसेच ग्रामपंचायतींची कर वसुली अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी क्यूआर कोड प्रणालीचा वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. डिजिटल पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांना सुलभता मिळण्यासोबतच ग्रामपंचायतींच्या उत्पन्नवाढीलाही मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, पाणीटंचाईचे संभाव्य आव्हान आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. पाणी उपलब्धतेचे नियोजन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि गावपातळीवर आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतींनी सज्ज राहावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत अभियानाच्या पहिल्या फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या येरगी (ता. देगलूर), बोंढार नेरली व वडवणा खडकी (ता. नांदेड), लखमापूर (ता. माहूर) आणि पिंपळगाव महादेव (ता. अर्धापूर) या पाच ग्रामपंचायतींच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाचे कौतुक करून इतर ग्रामपंचायतींनीही त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन मुख कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले.
याशिवाय बिलोली तालुक्यातील सगरोळी ग्रामपंचायतीने क्यूआर कोड प्रणालीच्या माध्यमातून कर वसुलीची प्रभावी पद्धत विकसित केल्याबद्दल, तर मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायतीने सौरऊर्जेच्या माध्यमातून ९२८ किलोवॅट क्षमतेचा सोलार मॉडेल व्हिलेज उपक्रम राबविल्याबद्दल या दोन्ही ग्रामपंचायतींचा विशेष गौरव करण्यात आला. बारड ग्रामपंचायतीच्या या उपक्रमासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. ग्रामसेवक संघटनेचे अमृत शिंदे यांनी ग्रामसेवकांच्या वतीने अभियान यशस्वी करण्याची ग्वाही दिली. गावागावांत उत्कृष्ट काम करून नांदेड जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत अधिकारी मधुकर मोरे यांनी अभियानासंदर्भात सविस्तर सादरीकरण केले. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनीही समस्या आणि अडचणी मांडल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करून अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावागावांत विकासाची नवी दिशा निर्माण करून गाव समृद्ध करण्याचा आणि नांदेड जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्याचा सामूहिक निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डी. बी. गिरी, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. एस. बी. खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.