नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते तातडीने जमा करा; दुष्काळ आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मागणी
अहिल्यानगर | रवीकुमार शिंदे
राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असून शेतीचा वाढता खर्च, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे प्रलंबित हप्ते अद्याप खात्यात जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. मात्र, योजनेचे हप्ते रखडल्याने शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना घरखर्च, शेतीचा खर्च आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक अडचणी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रलंबित हप्त्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, हप्ते जमा करण्याची निश्चित तारीख जाहीर करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थकीत रक्कम दिवाळीपूर्वी जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल – दुष्काळाच्या संकटात आणि दिवाळीच्या तोंडावर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार? बळीराजाला त्याच्या हक्काच्या आर्थिक मदतीसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार?
शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
आपलं सत्य अहिल्यानगर
सत्य, विश्वास आणि जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता.