पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे साखर कारखाना संचालक मंडळांना निर्देश; ९ नोव्हेंबरची अंतिम मुदत
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस दरासह विविध मागण्यांबाबत साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत कारखान्यांतील वजनकाट्यांची संयुक्त पथकामार्फत तपासणी तसेच स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सन २०२६-२७ च्या ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींकडून विविध मागण्या व समस्या जाणून घेण्यात आल्या.
ऊस दर आणि इतर मागण्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी स्वतंत्र बैठक घ्यावी आणि ९ नोव्हेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
वजनकाट्यांची संयुक्त पथकामार्फत तपासणी
कारखान्यांतील वजनकाट्यांच्या अचूकतेबाबत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार तहसीलदार आणि वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करून वजनकाट्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीवेळी शेतकरी अथवा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वजन प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र
गळीत हंगामादरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात समन्वय राखून प्रश्न सोडविणे ही शासनाची भूमिका असून, शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपमहापौर धनंजय जाधव, प्रादेशिक उपसंचालक (साखर) संजय गोंदे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपलं सत्य अहिल्यानगर
संपादक : रवी कुमार शिंदे
सत्य, विश्वास आणि जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता.
#अहिल्यानगर #ऊसदर #राधाकृष्णविखेपाटील #ऊसउत्पादकशेतकरी #साखरकारखाना