जिद्द, त्याग आणि यशाची खरी कहानी -ऋतुजा रामा माने

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/11/2026 1:46 AM



चार वर्षांपूर्वीची गोष्ट...

विठ्ठलवाडी, ता. कवठेमहांकाळ येथे शिक्षणासाठी आजी-आजोबांच्या गावी राहणारी ऋतुजा, उन्हाळी सुट्टीसाठी बामनोली गावात आई-वडिलांकडे आली होती. आई-वडील मोलमजुरी करून भाड्याच्या खोलीत राहणारे. पदरी चार मुलं, घरची परिस्थिती बेताची.

सुट्टीत शेजारच्या मुलींबरोबर ती पण मैदानावर येऊ लागली. क्रॉस कंट्री, रनिंगच्या सरावात तिच्यातलं टॅलेंट दिसलं. एक-दोन स्पर्धेत तिने आपलं कौशल्य दाखवलंच.

तेव्हा प्रशिक्षक म्हणून मी तिच्या पालकांना एकच विनंती केली - _"तिला गावी पाठवू नका. तिचा शैक्षणिक खर्च मी बघतो. या मुलीत टॅलेंट आहे, ती उंच भरारी घेईल."_

सगळ्या पै-पाहुण्यांचा विरोध पत्करून, एका आशेवर आई-वडिलांनी तिला इथेच ठेवलं.

ऋतुजानेही मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

सुरुवातीला रनिंग, मग उंच उडीचा प्रयत्न... पण तिचं खरं कौशल्य दिसलं ते *3 किमी चालणे (Race Walk)* या क्रीडा प्रकारात!

मग मागे वळून पाहिलंच नाही...

*तिचा प्रवास असा राहिला:*
पहिल्याच शालेय मैदानी स्पर्धेत - कोल्हापूर विभागात *2रा*, राज्यात *3रा* क्रमांक
दुसऱ्या वर्षी - राज्य पातळीवर *2रा* क्रमांक, पहिली National खेळली, थोडक्यात यश हुकलं
*2026* - महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन ज्युनिअर मैदानी स्पर्धा, 18 वर्षे वयोगट - *सुवर्णपदक 🥇*
त्यानंतर चेन्नई National - देशात *4था* क्रमांक
लगेचच महाराष्ट्र शालेय ॲथलेटिक्स स्पर्धा, 17 वर्षे वयोगट - *सुवर्णपदक 🥇*

आणि आता...

*तिची मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे तिचं 3रं National आहे!*

आजपर्यंत तिच्या नावावर *2 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य* पदकं आहेत.

एका भाड्याच्या खोलीतून राष्ट्रीय मैदानापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. यात तिचे कष्ट, आई-वडिलांचा विश्वास आणि गावकऱ्यांचे आशीर्वाद आहेत.

ऋतुजा, तुझ्या कष्टाला यश मिळो, यावेळी पदक घेऊनच ये... हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏

Share

Other News

ताज्या बातम्या