महावितरण, आरोग्य आणि पशुसंवर्धन यंत्रणांनी वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अकोले | प्रतिनिधी
टंचाई निवारणासाठी शासन संवेदनशीलतेने विविध उपाययोजना राबवत असून नागरिक आणि शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.
अकोले येथील पंकज लॉन्स येथे आयोजित तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. गायसमुद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधीर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. उमेश पाटील, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने, राजूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी आणि आदिवासी नागरिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या समस्या कार्यालयात नव्हे, तर थेट शेतात जाऊन सोडवा
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण केवळ कार्यालयात बसून न करता संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पशुधन लसीकरण, पिकांचे पंचनामे, पीकविमा संदर्भातील कार्यवाही तसेच महावितरणकडून होणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या दूर करण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, महसूल आणि महावितरण विभागाने संयुक्तपणे क्षेत्रभेटी देऊन अहवाल सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.
केलेल्या कामकाजाचा दर महिन्याला आढावा घेतला जाणार असून कर्तव्यात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठा ठेवा
अकोले तालुका प्रामुख्याने आदिवासी भाग असल्याने सर्पदंशाच्या घटनांवर तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये अँटी-स्नेक व्हेनम (Anti-Snake Venom) तसेच आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
याबाबत येणाऱ्या तक्रारींची वस्तुस्थिती तपासून जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.
भंडारदरा धरणग्रस्तांच्या जमिनींची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश
भंडारदरा धरणातील धरणग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या जमिनी ‘वर्ग एक’मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महसूल विभागाने तातडीने सुनावणी घ्यावी, असे निर्देश डॉ. विखे पाटील यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या नावावर जमिनींची नोंद होऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आदिवासी बांधवांना कसण्यासाठी देण्यात आलेल्या जमिनींबाबतही आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.
चारा लागवड आणि बियाणे वाटपाचे संयुक्त नियोजन
टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे चारा लागवडीचे नियोजन करावे. तसेच चारा बियाणे वाटपाची कार्यवाही वेळेत करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची मुख्यालयात उपस्थिती अनिवार्य
पशुसंवर्धन, महावितरण, महसूल आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात. टंचाईच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी दिला.
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि शेतकरी व आदिवासी बांधवांना त्यांच्या विभागामार्फत उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
खासगी सहाय्यकांकडून कार्यालयीन कामकाज करून घेऊ नका
शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी खासगी सहाय्यकांची परस्पर मदत घेऊ नये. विशेषतः पशुधन विकास अधिकारी आणि तलाठी यांनी याबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
कार्यालयीन कामकाजात गैरप्रकार आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करण्याच्या सूचना तालुकास्तरीय पशुसंवर्धन, महसूल आणि महावितरण विभागाच्या प्रमुखांना देण्यात आल्या.
दर महिन्याला टंचाई परिस्थितीचा आढावा
टंचाई परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे. नागरिकांच्या समस्या विहित वेळेत सोडवून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
दरम्यान, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या शेतीतील पंचनामे तसेच आरोग्य सुविधांबाबत आवश्यक मागण्या मांडल्या. तालुक्यात करण्यात आलेल्या टंचाई निवारण उपाययोजनांचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
संपादक: रवीकुमार शिंदे
आपलं सत्य अहिल्यानगर
ऑल इंडिया आरटीआय न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव
हिंदी मराठी पत्रकार संघ तालुका संघटक जामखेड
#अकोले #टंचाई #राधाकृष्णविखेपाटील #अहिल्यानगर #अकोलेशेतकरी #महावितरण #पशुसंवर्धन #आरोग्यविभाग #भंडारदरा #आदिवासीशेतकरी #किरणलहामटे #आपलंसत्यअहिल्यानगर