पत्रकार : रवी कुमार शिंदे
जिल्हा प्रतिनिधी
अहिल्या नगर, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता आणि समन्वयाने काम करावे. नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देताना निष्काळजीपणा केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संदान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नकडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार महेश सावंत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वप्निल वाळुंज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
ऑगस्ट २०२७ पर्यंत पाण्याचे नियोजन
दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नागरिकांना सुविधा देताना हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करताना तांत्रिक नोंदी वेळेत पूर्ण कराव्यात. एनडीआरएफ तसेच राज्य मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी तहसील कार्यालयात हेल्पलाइन सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.
पालखेड कालवा दुरुस्तीसाठी १ कोटी २० लाख
पालखेड कालव्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती डॉ. विखे पाटील यांनी दिली. पिकांसाठी पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात आले असून डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात दोन आवर्तनांद्वारे शेतीला पाणी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
थकीत पाणीपट्टीची वसुली तूर्तास करण्यात येऊ नये तसेच यापुढे पाणीपट्टीची मागणी करू नये, असे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चांदगव्हाणमध्ये बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना
कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण परिसरात बिबट्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीची दखल घेत वनविभागाने आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी डीपी आणि ट्रान्सफॉर्मरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित महावितरण अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर कार्यान्वित करून वीज भारनियमनाचा कालावधी कमी करावा, असेही त्यांनी सांगितले.
विवेक कोल्हे यांच्याकडून विविध मागण्या
विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे यांनी पीक कापणी प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष कापणी प्रयोगाची नोंद पंचनाम्यात करण्याची मागणी केली. ६३ गावांसाठी रब्बी हंगामात तीन पाणी आवर्तने देण्याची मागणी त्यांनी केली.
धोंडेवाडी आणि वेस गावातील पोटखराब क्षेत्राची नोंद करण्यासाठी महसूल विभागाने पाहणी करावी, शेतकऱ्यांना मोफत चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, उजव्या आणि डाव्या कालव्यातून समान पद्धतीने पाण्याचा विसर्ग करावा तसेच रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
पाणीपुरवठा योजनांसाठी निधीची मागणी
आमदार आशुतोष काळे यांनी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन चाऱ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्याची मागणी केली. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
बैठकीपूर्वी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावातील दुष्काळग्रस्त शेती आणि पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार आशुतोष काळे, नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
#राधाकृष्णविखेपाटील #कोपरगाव #पाणीटंचाई #दुष्काळ #पालखेडकालवा #जलसंपदा #शेतकरी #पाणीपुरवठा #अहिल्यानगर #महाराष्ट्रबातम्या #FarmerSupport #Kopargaon #RadhakrishnaVikhePatil #WaterScarcity #MaharashtraNews