आधुनिक, गुणवत्तापूर्ण व एआय शिक्षणासाठी ‘रयत’ कटिबद्ध

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 02/10/2026 11:06 PM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे )

चेअरमन चंद्रकांत दळवी : आश्वी येथे एक कोटींच्या देणगीतून साकारणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

आश्वी, ता. संगमनेर : बदलत्या काळाची पावले ओळखून आधुनिक तंत्रज्ञानासह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (एआय) शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रयत शिक्षण संस्था कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले.

आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल व शांताबाई मुळचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अशोक मुळचंदजी बोरा यांनी दिलेल्या एक कोटी रुपयांच्या देणगीतून साकारण्यात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून दळवी बोलत होते.

यावेळी आमदार रोहित पवार, विशेष अतिथी अॅड. अशोक बोरा, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

दळवी म्हणाले, रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याची गरज आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन खंडांत ‘शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा’ तयार करण्यात आला असून, तो संस्थेतील सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांना अभ्यासासाठी देण्यात आला आहे.

शरद पवार वयाच्या ८६-८७ व्या वर्षीही आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या अत्याधुनिक विषयांचा अभ्यास करतात. त्यांचा हा ज्ञानाचा ध्यास विद्यार्थ्यांनी आदर्श म्हणून घ्यावा, असेही दळवी यांनी सांगितले.

संपत्तीचा उपयोग समाजासाठी व्हावा : रोहित पवार

आमदार रोहित पवार म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. लक्ष्मीबाईंनीदेखील स्वतःचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. संपत्ती कितीही मिळवली तरी तिचा समाजासाठी कसा उपयोग केला जातो, यावर तिची खरी किंमत ठरते.

मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी देणगी : अॅड. बोरा

अॅड. अशोक बोरा म्हणाले, माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आश्वीच्या याच मातीत झाले. माझ्या आयुष्यातील यशाचा पाया या शाळेने घातला. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात मातृसंस्थेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून एक कोटी रुपयांची देणगी दिली. या निर्णयाला माझ्या संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा आहे.

कर्मवीरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी केले. त्यांनी आश्वी विद्यालयाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत कॉम्रेड पी. बी. कडू पाटील, शंकरराव काळे यांच्यासह विविध मान्यवरांचे योगदान राहिले आहे. कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने या सर्वांच्या योगदानाचे स्मरण करून कर्मवीरांचा विचार पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास अॅड. संदीप वर्पे, राजेंद्र चांदे, जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम, एकनाथ घोगरे, किरण पाटील, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सुमतीलाल गांधी, सतीश होडगर, गणेश बाळासाहेब गायकवाड, प्रभारी प्राचार्य दीपक चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक रमेश थेटे यांच्यासह आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, प्रतापपूर, उंबरी बाळापूर, डिग्रस, मालुंजे व आंभोरे परिसरातील ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या