◆ अतिदक्षता, नवशिशू, शीत शवगृहासह शव विच्छेदन विभाग अद्यावत करण्याची मागणी...
शहरातील मिरज शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुविधांचा अभाव असून सर्वसामान्य रूग्णांची फरफटत होत आहे. म्हणून शासकीय रूग्णालयात अतिदक्षता, नवशिशू विभाग, शीत शवगृह आणि शवविच्छेदन विभाग अद्यावत करण्याची तसेच, रूग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडून रूग्णांना मिळणारी गैरवागणूक थांबविण्यासाठी मिरज सुधार समितीने थेट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना साकडे घालत निवेदन दिले. यावेळी आमदार सुरेश खाडे, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपस्थित होते.
रविवारी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे युनिक हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले असता, मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, जहीर मुजावर, सिध्दार्थ पोळ, अशोकसिंग रजपूत, वसीम सय्यद, तौफिक देवगिरी, श्रीकांत महाजन, अभिजीत दाणेकर आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मिरज शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभाग अद्यावत नसल्याने रूग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. शीत शवगृह आणि शवविच्छेदन विभाग अद्यावत करावे, नवशिशू विभाग (एनआयसीयु) विभागालगत बाळंतपण मातांना राहण्यासाठी खाट उपलब्ध करून द्यावे, रूग्णालयात वारंवार औषधांचा आणि रिबेज इंजेक्शनचा तुडवडा होत असल्याने रूग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून रूग्णांच्या नातेवाईकांना अरेरावीसह मारहाणीचे प्रकारही घडत आहेत. मिरज शासकीय रूग्णालयातील असुविधांविषयी स्वतंत्र व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मिरज सुधार समितीला दिले.