जिल्हयात लसीकरणासाठी प्रशासनाची नाविण्यपुर्ण रणनीती

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 21/05/2021 12:51 PM



तालुकानिहाय सुक्ष्म कृती आराखडा, तीन टप्प्यात लसीकरण मोहिम

गडचिरोली,(जिमाका)दि.20: जिल्हयात ग्रामीण तसेच आदिवासी भागात कोविड लसीकरणाबाबत अफवा तसेच गैरसमज असल्याचे प्रशासनाच्या सर्वेक्षणावरुन आढळून आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक तालुका निहाय सुक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जे गाव जास्त संख्येने लसीकरणासाठी तयार आहे त्या ठिकाणी पात्र नागरिकांना प्राधान्याने लसीकरण दिले जात आहे. तसेच ज्या गावांमध्ये अफवा गैरसमज आहेत त्या ठिकाणीही जनजागृती करुन लसीकरण मोहिमेला गती दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यात लसीकरण घेण्यास तयार असलेल्या गावांची वयोमानानूसार यादया तयार करणेत येणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरीय टीम गावात जावून लसीकरण मोहिम राबविणार आहे.

ग्रामीण तसेच आदिवासी भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी लसीकरणावेळीही जनजागृतीपर माहिती दिली जाणार आहे. लसीकरणा दिवसी गावागावात स्थानिक पदाधिकारी यांनाही लसीकरणासाठी आमंत्रित केले जाणार आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी लसीकरणासाठी आणलेल्या कुपींची निवड लस घेणाऱ्याला करता येणार आहे. यातून आदिवासी भागात असलेला गैरसमज यामध्ये वेगवेगळया लसी असतात हा दूर होईल. तसेच गावात असणारे प्रतिष्ठित व पात्र व्यक्तींना यावेळी प्रथम लस देण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरुन इतरही गावातील लोक लस घेण्यास तयार होतील.

*अफवा, गैरसमज आणि सत्य*

1) *गैरसमज*  -  कोविड लस घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ति कमी होते. रिपोर्ट पॉझिटीव्ह येतो.
 *सत्य* -     ही लस मुळातच रोग प्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी आहे. दोन्ही डोस घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ति बरेच महिने कायम राहते. लस घेवूनही कोरोना होत असल्याचे प्रमाण नगण्य आहे. जर कोरोना झालाच तर तो सौम्य स्वरुपाचा राहतो.

2) गैरसमज - लस घेतल्यावर मृत्यू होतो.
     सत्य -  लस घेतल्यानंतर त्यामुळे मृत्यू झाला असे उदाहरण जिल्हयात नाही. आतापर्यंत हाजारो लोकांनी लस घेतलेली आहे. जे मृत्यू जिल्हयात झाले त्याची कारणे वेगळी आहेत. कोरोना लसीमूळे मृत्यू झाले नाहित. कोरोना लस घेतल्यावर कोरोना संसर्ग होत नाही व त्यातून मृत्यू टाळता येतो. 

3) गैरसमज - कोरोना आदिवासी भागातील लोकांना होत नाही. ती शहरातील बिमारी आहे.
     सत्य - कोरोना आजार संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या संपर्कात आल्यास होतो. आदिवासी तसेच ग्रामिण भागातील लोक कामानिमित्त तालुका व इतर शहरात जात असतात. अशावेळी आवश्यक खबरदारी घेतली नाही तर कोरोना संसर्ग होवू शकतो. या वेळी जिल्हयात कित्येक आदिवासी दुर्गम गाव-टोल्यावर कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

4) अफवा - कोरोना नसताना अहवाल पॉझिटिव्ह देतात. दवाखान्यात नेवून अवयव काढून घेतात.
       सत्य -  एखाद्या चांगला व्यक्तीला ज्याला लक्षणे नाहित अशांचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर त्यांना गावस्तरावरच विलगीकरणात ठेवले जाते. किंवा घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येते. ज्यांना लक्षणे आहेत त्यांना तातडीने उपचाराची गरज असते म्हणून दवाखान्यात भरती करावे लागते. कोरोना झाल्यावर अथवा त्याचा मृत्यू झाल्यास कोणतेही अवयव काढले जात नाहित. जिल्हयात तशी व्यवस्थाच नाही. तशी उपकरणेही उपलब्ध नाहित.

5) गैरसमज - अहवाल पॉझिटीव्ह दिल्यास आरोग्य विभागाला, त्यांच्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात .
       सत्य -   आरोग्य विभाग व त्यामधील कर्मचारी गेले कित्येक दिवस आहोरात्र सेवा देत आहेत. कोरोनामुळे जिल्हयात 3 आरोग्य सेवक, 1 आशा कार्यकर्ती व 1 औषध निर्माण अधिकारी मृत पावला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाबाबत गैरसमज असणे चुकिचे आहे. उलट त्यांची जबाबदारी ही आहे की सामान्य नागरिकांचे जीव वाचविणे. कोरोना रुग्णसंख्या वाढवल्याने कोणत्याही प्रकारचा निधी शासनाकडून आरोग्य कर्मचाऱ्याला दिला जात नाही ती निव्वळ अफवा आहे.

6) गैरसमज - आरोग्य खात्याला जवळ येवू देणार नाही. त्यांची औषधे घेणार नाही. कोरोना तपासणी करु देणार नाही. 
      सत्य -  गडचिरोली जिल्हयात दुर्गम भागात ऊन वारा पावसामध्ये आरोग्य विभागाने यशस्वी सेवा दिली आहे. आता कोरोना ही वैश्विक महामारी आहे. कोरोना होवू नये म्हणून आरोग्य विभाग गावागावात माहिती देत आहे. कोरोना तपासण्याही करत आहे व रुग्णांवर औषधोपचारही करत आहे. हे केवळ लोकांच्या हितासाठी कामे केली जात आहेत. कोरोनापासून कोणाच्याही कुटुंबाचे नुकसान होवू नये म्हणून आरोग्य विभागाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

7) गैरसमज - आमच्या गावातील पुजाऱ्याकडे कोरोनावर औषध आहे.
    सत्य  - कोरोनावर कोणतेही खात्रीशीर सद्या औषध नाही. त्यावर काम सुरु आहे. दवाखान्यात संसर्ग कमी करण्यासाठी औषधोपचार केले जातात. उलट गावात उपचार घेवून संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. उपचारावेळी गावातील त्या पुजाऱ्याला संर्सग होण्याची जास्त शक्यता असून त्यामुळे इतरांनाही संसर्ग होण्याची शक्यता आहे.

8)  अफवा - कोरोना ही साजीश आहे. आणि लस घेतल्यावर म्हातारी लोक मरता, तरुणांमध्ये नपुंसकत्व/ वंध्यत्व येते.
         सत्य - राजकीय नेत्यांनी कोरोना आणला त्याची ही साजीश आहे हे खरे नाही. कारण आतापर्यंत कित्येक नेत्यांना कोरोना झाला आहे. त्यातून ते बरेही झालेत. तेव्हा कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे अनिवार्य आहे. लस घेतल्यावर कोणीही दगावत नाही . लस घेतल्यास संसर्ग टाळता येतो. तसेच लसीमुळे नपुंसकत्व किंवा वंध्यत्व येत नाही. लस घेतल्यास कोरोना संसर्गा विरुद्ध प्रतिकारक क्षमता वाढते.

 *21 कलमी कार्यक्रमाची अंमालबजावणी* - लसीकरणाला जिल्हयात गती देण्यासाठी आरोग्य विभागाकडून 21 प्रकारच्या उपाययोजना मार्गदर्शनपर तयार करण्यात आल्या आहेत. या विविध उपाय योजनांची अंमलबजावणी गावस्तरापर्यंत आरोग्य विभाग करणार आहे. यामध्ये कोरोना चाचण्यांपासून विलगीकरण व लसीकरण या बाबींच्या समावेश आहे. लसीकरणात वाढ होण्यासाठी पोस्टर, कलापथक, विविध माध्यमे, महिला बचत गट सदस्या, ग्रामदक्षता समिती यांची मदत घेतली जाणार आहे.
******

Share

Other News

ताज्या बातम्या