भगूर उड्डाणपुलाखालील अनधिकृत कचरा डेपोवर अखेर प्रशासनाचा हातोडा!

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 27/11/2026 10:21 PM

​बातमीचा दणका: भगूर उड्डाणपुलाखालील अनधिकृत कचरा डेपोवर अखेर प्रशासनाचा हातोडा! 

देवळाली कॅन्टोन्मेंट व भगूर नगरपरिषदेची  स्वच्छता मोहीम सुरू.
मुलभूत गरजा पुर्ण करूनच...खरा विकास उभारला जावू शकतो असे प्रतिपादन यावेळी समितीचे मुख्य महासचिव अमोलभाऊ भागवत यांनी केले.
​
भगूर / देवळाली कॅम्प (प्रतिनिधी):
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पावन जन्मभूमीत, भगूर गावालगत असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना तयार झालेले वाढते कचऱ्याचे साम्राज्य अखेर प्रशासनाने हटवले आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा आक्रमक पवित्रा आणि 'अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती'ने केलेल्या नियोजनशील पाठपुराव्याची दखल घेत, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि भगूर नगरपरिषद या दोन्ही प्रशासनांनी दोन दिवसा पासून आपापल्या परिसरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
​नेमके प्रकरण काय होते?
भगूर उड्डाणपुलाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला परिसरातील काही हॉटेल्स, हॉस्पिटल्स, चायनीज गाडे, मांस-मच्छी विक्रेते आणि काही बेजबाबदार नागरिकांकडून वारंवार विरोध होऊनही उद्दामपणे दुर्गंधीयुक्त कचरा, सडलेले अन्न आणि मृत जनावरे आणून टाकली जात होती. यामुळे या ठिकाणी अनधिकृत कचरा डेपो तयार होऊन परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. याविरोधात प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे फोटोसह तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिक संतापले होते.
​ज्येष्ठ नागरिक आणि समितीचा पुढाकार
अखेर त्रस्त झालेल्या विजयनगर व भगूर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत 'अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती'च्या जिल्हाध्यक्षांकडे धाव घेतली. याप्रसंगी नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत, अविनाशभाऊ वाघ, शिवसेना नेते कैलास गायकवाड, सेवानिवृत्त नामदेव कस्तुरे सर, उद्योजक नंदूजी लाहोटी, संजय बलकवडे, जगन पवार, बलराम वाघमारे, किशोर भवार, बाळासाहेब साळवे, सतिश भगत, अशोक सदावर्ते, श्यामआप्पा डावरे, विशाल पवार, विजय गांगुर्डे, अनिल कटारे आदी मान्यवर व नागरिकांनी या कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून तीव्र निषेध नोंदवला होता.
​समितीची मागणी आणि प्रशासनाची तत्परता
समितीच्या वतीने दोन्ही स्थानिक प्रशासनांना धारेवर धरत कचरा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. या बातमीची आणि नागरिकांच्या भावनांची गंभीर दखल घेत आज दोन्ही प्रशासनांनी आपापल्या हद्दीतील कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण परिसर काटेकोरपणे स्वच्छ केला जात आहे.
​पुढील ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा
साफसफाई सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी, हा कचरा पुन्हा पडू नये यासाठी समितीने सुचवलेल्या पुढील मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे:
​परिसरात तातडीने सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवावेत.
​कचरा टाकणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाईचे फलक लावावेत, यांविषयी समितीकडून बोलणी करण्यात येईल. 
​सुरुवातीच्या काळात या भागावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाचे विशेष प्रतिनिधी नेमावेत.
​नागरिकांच्या एकजुटीमुळे आणि योग्य पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग आली असून, आता हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहील, अशी अपेक्षा भगूर व विजयनगरच्या रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या