*शेटे महाविद्यालयात 'संविधान दिन' मोठ्या उत्साहात साजरा...*
भगूर प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी आणि भारतीय संविधानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी, आज शिक्षण मंडळ भगूर संचालित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय देवळाली कॅम्प येथे 'संविधान दिन' मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 'संविधानाच्या उद्देशिकेचे' (सरनाम्याचे) सामूहिक वाचन केले. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा यावेळी सर्वांनी पुनरुच्चार केला.
या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "भारतीय संविधान हा केवळ एक कायदेशीर ग्रंथ नसून, तो आपल्या सर्वांसाठी एक जीवनमार्ग तथा पाथेय आहे. संविधानाने आपल्याला केवळ मूलभूत अधिकारच दिले नाहीत, तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या हक्कासोबत कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानातील मूल्यांचे आचरण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया धोंगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.