देवळाली कॅम्पमध्ये बांधकाम व्यावसायिकाची १ कोटी २३ लाखांची फसवणूक; बनावट कागदपत्रांआधारे 'भोंदूबाबा'चा डाव

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 27/11/2026 7:18 PM

देवळाली कॅम्पमध्ये बांधकाम व्यावसायिकाची १ कोटी २३ लाखांची फसवणूक; बनावट कागदपत्रांआधारे 'भोंदूबाबा'चा डाव

​देवळाली कॅम्प:

बनावट साठेखत, अधिकारपत्र आणि गोड बोलून विश्वास संपादन करत एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार देवळाली कॅम्प परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कथित भोंदूबाबा अरुण धोंडू पाटील याच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​नेमका प्रकार कसा घडला?

​या प्रकरणातील फिर्यादी अतिश महेंद्र शहा (रा. राका कॉलनी, नाशिक) हे देवळाली कॅम्प परिसरातील बांधकाम व्यावसायिक आहेत. संशयित आरोपी अरुण पाटील (रा. तानाजी निवास, गंगापूर, नाशिक) याने शहा यांच्याशी जवळीक निर्माण करून त्यांचा विश्वास संपादन केला.

​यानंतर आरोपीने विहितगाव शिवारातील सर्व्हे क्रमांक ५१/२ मधील १८४ आर क्षेत्राचे मूळ साठेखत असल्याचे भासवून व्यावसायिकास व्यवहारासाठी प्रवृत्त केले. तसेच सर्व्हे क्रमांक ५४१, ४०/२/अ, ४०/२/ब आणि ४०/२/क या मिळकतींच्या मूळ मालक पंडित बळवंत बोराडे व इतरांच्या नावाने बनावट साठेखत आणि अधिकारपत्र तयार केले. ही कागदपत्रे खरी असल्याचा बनाव रचून व्यवहार निश्चित करत आरोपीने शहा यांच्याकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात एकूण १ कोटी २३ लाख ५० हजार रुपये उकळले.

​पैसे घेऊन मिळकत परस्पर विकली

​रक्कम मिळाल्यानंतर संबंधित मिळकत शहा यांना देण्याऐवजी ती परस्पर दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२१ ते २५ नोव्हेंबर २०२६ या दीर्घ कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहा यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

​पोलिसांचा तपास सुरू; नागरिकांत चिंता

​या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिसांनी आरोपी अरुण पाटीलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पाडेकर पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणात आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, तसेच बनावट कागदपत्रांच्या व्यवहारात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

​दरम्यान, देवळाली कॅम्प परिसरातील जमीन व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर होत असल्याच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या