स्वाधार योजनेच्या अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ;अनुसूचित जातीच्या पात्र विद्यार्थ्यांनी नवीन, नूतनीकरणाचे अर्ज व प्रलंबित त्रुटींची पूर्तता करावी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/11/2026 8:05 AM

नांदेड :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पात्र विद्यार्थ्यांना नवीन अर्ज, नूतनीकरणाचे अर्ज तसेच प्रलंबित अर्जांतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर नवीन अर्ज भरावेत. नूतनीकरणासाठी पूर्वीचा वापरकर्ता क्रमांक व परवलीचा शब्द वापरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पूर्ण करावा. तसेच अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून त्रुटींची पूर्तता निर्धारित मुदतीत करावी. मुदतीनंतर नूतनीकरणाचे अर्ज भरता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी विलंब न करता अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी व संकेतस्थळावर अर्जाची सद्यस्थिती तपासावी.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जाची प्रत संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रात जमा करावी. योजनेसंदर्भातील अधिकृत माहिती व अडचणींचे निराकरण करण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाच्या samajkalyannanded या अधिकृत फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला अनुसरावे. तसेच कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिकृत व्हॉट्सॲप गटात सहभागी व्हावे. अनधिकृत व्यक्ती किंवा गटांकडून माहिती घेणे टाळावे. काही अडचणी असल्यास समाजकल्याण कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या