दुष्काळात चारा लागवडीतून पशुधनाला आधार;रोहयोतून चारा पिकांसाठी आर्थिक मदत व रोजगार; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व सीईओ महेश पाटील यांचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/11/2026 8:08 AM

नांदेड :- दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात चारा पीक लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत चारा पिकांच्या लागवडीसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे पशुपालकांना चारा उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी चारा पीक लागवड करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या (रोहयो प्रभाग) 6 नोव्हेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध चारा पिकांच्या लागवडीसाठी रोपे, बियाणे, मजुरी व सामग्री यासाठी आर्थिक तरतूद निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मका लागवडीसाठी हेक्टरी 47 हजार 307 रुपये व 95 मनुष्यदिवस, ज्वारीसाठी 42 हजार 778 रुपये व 88 मनुष्यदिवस, तर बाजरीसाठी 35 हजार 505 रुपये व 74 मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध होणार आहे. नेपिअर गवत लागवडीसाठी 76 हजार 31 रुपये व 155 मनुष्यदिवस, मेथी घास (ल्युसर्न) लागवडीसाठी 1 लाख 13 हजार 290 रुपये व 270 मनुष्यदिवस, ज्वारी मल्टीकटसाठी 52 हजार 36 रुपये व 100 मनुष्यदिवस, तर बाजरी मल्टीकटसाठी 76 हजार 45 रुपये व 180 मनुष्यदिवस रोजगाराची तरतूद करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईमुळे पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा उपयोग करून चारा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यासोबतच पशुपालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी चारा पीक लागवडीसाठी संबंधित पंचायत समिती कार्यालय किंवा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून योजनेची माहिती घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या